BIS Writing Competition : बीआयएस (BIS) मानक लेखन स्पर्धेत तनिष्का चव्हाण आणि किरण थोरात प्रथम!

उत्तमनगर येथील माध्यमिक विद्यालयात मानक लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न : स्पर्धेत ८५ विद्यार्थ्यांचा सहभाग 

BIS Writing Competition : बीआयएस (BIS) मानक लेखन स्पर्धेत तनिष्का चव्हाण आणि किरण थोरात प्रथम!
पुणे:- उत्तमनगर माध्यमिक विद्यालयातील बी.आय.एस. मानक लेखन स्पर्धेतील पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांसोबत शाळेचे शिक्षक व अन्य.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १३ ऑगस्ट २०२६ :- पुणे शहरातील उत्तमनगर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात बीआयएस (BIS) मानक क्लबच्यावतीने घेण्यात आलेल्या लेखन स्पर्धेत स्पर्धेत तनिष्का अजय चव्हाण आणि श्रावणी किरण थोरात या दोघींनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत ८५ विद्यार्थी सहभागी झाले होते. 

या स्पर्धेत हर्ष गणेश मारणे व दर्शन बाळकृष्ण किंडरे यांनी द्वितीय, कीर्ती रामदास देवकते व सृष्टी गणेश साळुंखे यांनी तृतीय तर, त्रिजल संजय मिरजकर व अथर्व श्याम शिंदे चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. 

या माध्यमिक विद्यालयात विद्यालयात कार्यरत असलेल्या बीआयएस (BIS) मानक क्लबचे हे चौथे वर्ष असून, गेल्या तीन वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबतच पालक व परिसरातील नागरिकांमध्ये भारतीय मानके, गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रमाणित वस्तूंच्या वापराबाबत जनजागृती करण्याचे कार्य केले जात आहे. 

याच उपक्रमांचा एक भाग म्हणून मानक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मानक क्लबच्या मार्गदर्शिका प्रांजली दीक्षित यांनी क्लबच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या आढाव्यात त्यांनी बीआयएस (BIS)  मानकांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, प्रमाणित वस्तूंची ओळख आणि गुणवत्तापूर्ण वस्तूंच्या वापराची गरज याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी BIS मानक क्लबची प्रतिज्ञा घेतली. 

मुख्याध्यापक ए. आर. खोपडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि या मानकांविषयीची जागरूकता समाजात पोहोचविण्याचे आवाहन केले. या स्पर्धेत मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली. शिवाय विद्यालयाच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी हेमलता जावळकर,चेतन डिंबळे व सुनील शिंदे उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी BIS पुणे कार्यालयाचे हर्षवर्धन शुक्ला तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मूल्यमापन अधिकारी किरण देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.