धष्टपुष्ट रहायचेय तर, शेती पिकांसाठी परंपरागत देशी बियाणांचा वापर करा - बीजमाता राहीबाई पोपेरे यांचा बचत गटांच्या महिलांना सल्ला 

पुणे जिल्हा बँकेतील बचत गटांच्या महिलांच्या स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा बॅंकेचा उपक्रम

धष्टपुष्ट रहायचेय तर, शेती पिकांसाठी परंपरागत देशी बियाणांचा वापर करा - बीजमाता राहीबाई पोपेरे यांचा बचत गटांच्या महिलांना सल्ला 
जिल्हा बॅंक, पुणे:- सर्वोत्कृष्ट महिला बचत गटांचा गौरव करताना बीजमाता राहीबाई पोपेरे व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे व उपाध्यक्ष सुनील चांदेरे आदी
धष्टपुष्ट रहायचेय तर, शेती पिकांसाठी परंपरागत देशी बियाणांचा वापर करा - बीजमाता राहीबाई पोपेरे यांचा बचत गटांच्या महिलांना सल्ला 

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. १२ मार्च २०२५ :-  बाई, आमचा जमानाच येगळा हुता. त्याकाळी आमाला खाण्यासाठी अस्सल गावरान अन्नधान्य मिळायचं. त्यामुळंच तर जुने लोक हे काटक आणि कसलही दुखणं  नसलेले हाईत. पण आता जमाना बदलला आणि खाणंपिण्यातही हाईब्रीट वाढलं. यामुळंच तर आताची माणसं ही येगयेगळ्या दुखण्यांनी बेजार हुत हाईत‌. हे सगळं टाळण्यासाठी आणि शरीर धष्टपुष्ट राहण्यासाठी परंपरागत देशी बियाणांशिवाय दुसरा पर्यायीचं नाय. म्हणून तर मी म्हणते, शेतात ईविध पिकांची पेरणी करण्यासाठी देशी बी-बियाणांचा वापर करा, अशा ग्रामीण भागातील बोली भाषेतील शैलीत बीजमाता सौ. राहीबाई पोपेरे यांनी पुणे जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांना देशी बियाणांचे महत्त्व समजावून सांगितले. शिवाय किमान यापुढे तरी शेतीत देशी बियाणांचा वापर करा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. 

निमित्त होते बचत गटांच्या महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळावा आणि गौरव समारंभाचे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील बचतगटांच्या महिलांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.प्रा. दिगंबर दुगडि हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, 
निधी संकलन आणि भागिदारी, स्वयं शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. मंजुषा कदम, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. हेमा यादव, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) महाव्यवस्थापक स्मृती भगत, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई, संचालक  पुजा बुट्टे पाटील, निर्मला जागडे आदी उपस्थित होते.

परंपरागत देशी बी-बीयाणे व वाण हे बदलत्या आधुनिक युगात निरोगी आरोग्यासाठी महत्तवपूर्ण आहेत. हे बियाणे कसे महत्वपूर्ण आहेत आणि त्यांचे उपयोग कसे आहेत हे पोपेरे यांनी विविध उदाहरणांसह उकल करत सांगितले.

 या समारंभात डॉ. मंजुषा कदम यांचे "आरोग्यमयी स्त्री" या विषयावर,  हेमा यादव यांचे स्त्री प्रबोधन या विषयावर तर, स्मृती भगत यांचे स्त्रियांसाठी उपयुक्त सरकारी योजना या विषयावर व्याख्यान झाले. दरम्यान जिल्हा बँकेमार्फत बँक व नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी खाद्य महोत्सवाच्या लघु माहितीपटाचे अनावरण करण्यात आले. या माहितीपटात बँकेशी संलग्न असलेल्या महिला बचतगटांच्या यशोगाथा चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आल्या. या स्नेहमेळाव्यात पुणे जिल्ह्यातील ३५० हून अधिक महिला बचत गट सहभागी झाले होते. या समारंभात जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ३० उत्कृष्ठ बचतगटांची निवड बचतगटांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.