Reservation draw for Panchayat Samiti Chairman announced :- महाराष्ट्रातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे येत्या गुरुवारी आरक्षण जाहीर होणार!
राज्यातील ३२१ सभापतींच्या आरक्षणाची सोडत काढणार : आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ८ ऑक्टोबर २०२५ :- महाराष्ट्रातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठींच्या राखीव जागा निश्चित करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.९ ऑक्टोबर) आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यामध्ये राज्यातील ३२१ पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे. या आरक्षण सोडतीबाबतचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. ही सोडत आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात काढली जाणार आहे.
दरम्यान, कोणत्या प्रवर्गासाठी किती सभापती पदे असावीत, यापैकी प्रवर्गनिहाय महिलांसाठी किती सभापती पदे आरक्षित करण्यात यावीत, याची राज्य आणि जिल्हानिहाय संख्या राज्य निवडणूक आयोगाने निश्चित करुन दिली आहे. यानुसार आयोगाने निश्चित करुन दिलेल्या संख्येनुसारच त्या त्या प्रवर्गासाठी पंचायत समिती सभापतींचे पद आरक्षित केले जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निश्चित करुन दिलेल्या प्रवर्गनिहाय संख्येनुसार राज्यातील ३२१ सभापती पदांपैकी अनुसुचित जाती प्रवर्गासाठी (एस.सी.) ४३ सभापती पदे आरक्षित केली जाणार असून यापैकी २३ पदे ही या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी (एस.टी.) राज्यातील ३१ पंचायत समित्यांचे सभापतीपदे राखीव ठेवण्यात येणार आहेत. यापैकी १९ सभापती पदे ही महिलांसाठी राखीव ठेवली जाणार आहेत.
महाराष्ट्रातील एकूण ३२१ सभापती पदांपैकी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ९१ सभापती पदे आरक्षित केली जाणार आहेत. यापैकी ४६ पदे ही महिलांसाठी राखीव असणार आहेत. उर्वरित १५६ सभापती पदे ही खुली (सर्वसाधारण) ठेवण्यात येणार आहेत. खुल्या गटातील १५६ पैकी ८१ सभापती पदे ही महिलांसाठी राखीव असणार आहेत.
पंचायत समिती सभापतीपदांची आरक्षण सोडत दृष्टीक्षेपात...!
- महाराष्ट्रातील पंचायत समित्यांची संख्या --- ३३६
- गुरुवारी आरक्षण जाहीर केल्या जाणाऱ्या पंचायत समिती सभापतींची संख्या --- ३२१
- अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव पदांची संख्या --- ४३
- अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित सभापती पदे --- ३१
- नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव सभापती पदे --- ९१
- खुल्या गटासाठी (सर्वसाधारण) राखीव सभापती पदे --- १५६.
प्रवर्गनिहाय महिलांसाठी आरक्षित होणारी सभापती पदे
- अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव पदांची संख्या --- २३
- अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित सभापती पदे --- १९
- नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव सभापती पदे --- ४६
- खुल्या गटासाठी (सर्वसाधारण) राखीव सभापती पदे --- ८१
