भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त हिवरे येथे जेष्ठ नागरिकांचा सन्मान, भाजप नेते जालिंदर कामठे यांचा पुढाकार 

विकासाभिमुख कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा जालिंदर कामठे यांचा निर्धार

भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त हिवरे येथे जेष्ठ नागरिकांचा सन्मान, भाजप नेते जालिंदर कामठे यांचा पुढाकार 
हिवरे (ता. पुरंदर) :- ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केल्यानंतर त्यांना पेढे भरविताना भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे.

प्रा. मीरा बडे-सांगळे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ६ एप्रिल २०२५ :-   भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वर्धापन दिनानिमित्त भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी पुरंदर तालुक्यातील हिवरे येथील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून, विकासाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हाच भाजपचा  मुख्य हेतू आहे. यानुसार विकासाभिमुख कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचिवण्याचा निर्धार कामठे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

नागरिकांचा विकास हेच भारतीय जनता पक्षाचे ध्येय आहे. याच उदात्त हेतूने सर्वसामान्य कार्यकर्ता आज काम करत असताना आपणास पाहायला मिळत आहे. 'सबका साथ सबका विकास' हेच भाजपचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्याला अनुसरूनच भाजपचे सर्व कार्यकर्ते काम करत असतात, असेही मत कामठे यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला नीरा बाजार समितीचे माजी संचालक भानूकाका जगताप, किसान मोर्चाचे पुरंदर तालुका अध्यक्ष  संदीप देवकर, कुंभारवळणचे माजी सरपंच सचिन पठारे , एम. के नाना गायकवाड, हिवरे गावच्या सरपंच पुनम कामठे, उपसरपंच रामदास कुदळे,सुदर्शन कुदळे, शंकर कुदळे, दीपक गायकवाड, शामराव लिंभोरे आदी   मान्यवर उपस्थित होते.