Zilla Parishad Election Final Voter List Publication Date Extended : .... अखेर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ!
राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय,नवीन कार्यक्रम जाहीर : आता येत्या १२ नोव्हेंबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २७ ऑक्टोबर २०२५ :- महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास अखेर राज्य निवडणूक आयोगाने दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या अंतिम मतदार याद्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार निश्चित केलेल्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि.२७ ऑक्टोबर) प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत. नवीन कार्यक्रमानुसार आता येत्या १२ नोव्हेंबरला या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या संगणकीय प्रणालीत (सॉफ्टवेअर) तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ही मुदतीत देण्यात आली आहे. याबाबतची शक्यता ग्रामराज्य न्यूज पोर्टलने सोमवारी सकाळीच प्रसिद्ध केलेल्या वृत्तात व्यक्त केली होती. ती शक्यता या मुदतवाढीने तंतोतं खरी ठरली आहे. या मुदतवाढीमुळे मतदार याद्यांबाबतत मतदारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार याद्या सोमवारी (दि.२७ ऑक्टोबर) प्रसिद्ध करण्यात येणार होत्या.
नवीन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या मतदार याद्या प्रसिद्धीबाबतच्या नवीन कार्यक्रमानुसार येत्या दि. ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानंतर दि. ३ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत मतदारांना आणि सर्व पक्षांना या याद्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिवाय या अंतिम मतदार याद्यांमधील मतदारांची दुबार नावे वगळण्याचा आदेशही निवडणूक आयोगाने दिला आहे.
महाराष्ट्रातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल अनुक्रमे दि. २० मार्च आणि दि. १३ मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. त्यानंतर पुन्हा आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे.
येत्या ३ नोव्हेंबरपासून माहितीसाठी मतदार याद्या उपलब्ध होणार
दरम्यान, या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली असली आणि या मुदतवाढीनुसार आता या याद्या येत्या १२ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार असल्या तरीही मतदार, नागरिक आणि राजकीय पक्षांना येत्या ३ नोव्हेंबरपासून या मतदार याद्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
