Local body elections in Pune district 2025 : पुणे जिल्ह्यातील नगराध्यक्षांच्या १७ जागांसाठी तब्बल १९३ उमेदवारी अर्ज दाखल
नगरसेवकांच्या ३९८ जागांसाठी २६७१ उमेदवारी अर्ज : उमेदवारी अर्जांच्या छाननीला सुरुवात
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १८ नोव्हेंबर २०२५ :- पुणे जिल्ह्यातील १४ नगर पालिका आणि ०३ नगर पंचायतींच्या नगरसेवकांच्या एकूण 398 जागांसाठी तब्बल 2671 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय नगराध्यक्ष पदांच्या 17 जागांसाठी 193 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान या उमेदवारी अर्जांच्या छाननीस मंगळवारी (दि.१८ नोव्हेंबर) सकाळी अकरा वाजल्यापासून सुरूवात करण्यात आली आहे. त्यानंतर येत्या बुधवारपासून (दि.१९ नोव्हेंबर) दि. २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील एकूण १४ पैकी १४ नगरपालिका आणि एकूण ०४ नगरपंचायतींपैकी ०३ नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या दि.२ डिसेंबर रोजी होत आहे.यापैकी हवेली तालुक्यातील फुरसुंगी- उरळी देवाची या नगरपालिकेची आणि बारामती तालुक्यातील माळेगांव व आंबेगाव तालुक्यातील मंचर नगर पंचायतीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होत आहे. शिवाय खेड तालुक्यातील देहू नगरपंचायतीची निवडणूक दोन वर्षांपूर्वीच झालेली आहे.
यंदा सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या जिल्ह्यातील १४ नगर पालिकांमध्ये बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर,सासवड, जेजुरी, जुन्नर,आळंदी,चाकण,भोर, राजगुरुनगर, लोणावळा, तळेगाव दाभाडे, फुरसुंगी-उरळी देवाची यांचा तर, तीन नगर पंचायतींमध्ये वडगाव-मावळ (ता. मावळ), मंचर (ता. आंबेगाव) आणि माळेगांव बुद्रुक (ता.बारामती) आदींचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायतीच्या नगरसेवकांच्या एकूण ३९८ जागा आहेत. यापैकी तीन नगर पंचायतींचे प्रत्येकी १७ प्रमाणे एकूण ५१ नगरसेवक आणि उर्वरित ३४७ नगरसेवक हे नगर पालिकांसाठीचे असणार आहेत. यानुसार नगरपालिका व नगर पंचायतींच्या नगरसेवकांच्या एकूण ३९८ जागांसाठी २ हजार ६७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नगर पालिकांसाठीच्या २ हजार ३५६ तर, नगर पंचायतींसाठीच्या ३१५ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे.
बारामती नगरपालिकेसाठी जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज
दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या बारामती नगर पालिकेसाठी दाखल झाले आहेत. बारामती नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी २२ तर, नगर सेवकांच्या ४१ जागांसाठी तब्बल २९८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
नगराध्यक्ष पदांसाठी दाखल झालेले अर्ज
१) नगरपालिका
- बारामती --- २२
- लोणावळा --- ११
- दौंड --- १३
- तळेगाव दाभाडे ---०५
- चाकण ---०६
- फुरसुंगी -उरळीदेवाची --- १५
- सासवड --- १६
- जेजुरी ---०५
- इंदापूर --- १४
- शिरूर --- ०९
- जुन्नर --- १६
- आळंदी --- १६
- भोर ---०८
- राजगुरुनगर ---११
२) नगरपंचायत
- वडगाव मावळ ---०७
- माळेगांव बुद्रुक --- १०
- मंचर --- ०९
नगरसेवक पदांसाठी दाखल झालेले अर्ज
१) नगरपालिका
- बारामती --- २९८
- लोणावळा --- १४१
- दौंड --- १७७
- तळेगाव दाभाडे --- १३२
- चाकण --- १६६
- फुरसुंगी -उरळीदेवाची --- २१७
- सासवड --- १२९
- जेजुरी --- ८६
- इंदापूर --- १६९
- शिरूर --- २०२
- जुन्नर --- १३५
- आळंदी --- २१२
- भोर --- १२५
- राजगुरुनगर ---१६७
२) नगरपंचायत
- वडगाव मावळ --- ८२
- माळेगांव बुद्रुक --- ११९
- मंचर --- ११४
