Efforts to relax Ganeshotsav restrictions : 'राज्यातील गणेशोत्सवावर लादलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी न्यायालयात प्रयत्न करु'

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे गणेश मंडळांना आश्वासन : राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे  पारितोषिक वितरण 

Efforts to relax Ganeshotsav restrictions : 'राज्यातील गणेशोत्सवावर लादलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी न्यायालयात प्रयत्न करु'
पुणे:- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावलेल्या थेरगाव येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मित्र मंडळाला पारितोषिक प्रदान करताना अजित पवार व अन्य.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १ ऑगस्ट २०२५ :- महाराष्ट्रातील विविध सण व  उत्सव साजरे करत असताना काही नियम पाळावे लागतात. परंतु या नियमांचे उल्लंघन होऊ नये, या उद्देशाने न्यायालयाने  ध्वनिक्षेपक किंवा अन्य अनुषंगाने काही निर्बंध घातलेले आहेत. या निर्बंधांचा मोठा फटका महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला बसत आहे. त्यामुळे न्यायालयाने घातलेली ही बंधने शिथिल करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात योग्य बाजू मांडली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.१ ऑगस्ट) पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळांना दिले.

 पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४ या स्पर्धेतील पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळांना पवार यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार शंकर जगताप, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी,उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण,पिंपरी चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे समन्वयक विलास कामठे, बापूसाहेब धमाले, कैलास भांबुर्डेकर आदी उपस्थित होते. 

या समारंभात थेरगाव येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मित्र मंडळाला प्रथम, भोसरीतील कै.दामू शेठ गव्हाणे मित्र मंडळाला द्वितीय तर, वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी मित्र मंडळाचा तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरव करण्यात आला. आकुर्डीतील भैरवनाथ मित्र मंडळाने चौथ्या, पिंपळे गुरव येथील भैरवनाथ तरुण मंडळाला पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले‌‌. या स्पर्धेत सहभागी झालेल्या २६० मंडळांपैकी ९६ मंडळे ही विविध पारितोषिकांस पात्र ठरली.या स्पर्धेत विविध पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या गणेश मंडळांना एकूण १३ लाख ८६ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली.

पवार पुढे म्हणाले, "श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हे समाजसेवेचे शक्तिकेंद्र आहे. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव जगातील पावणे दोनशे देशात साजरा केला जातो. जगभरात गेलेले भारतीय गणेशोत्सव साजरा करत असतात. नवी पिढीदेखील या उत्सवात मनापासून काम करत असते. हे सर्व सण आपली भारतीय संस्कृती, परंपरा, सण हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत.सर्वांमध्ये आपलेपणा, एकोपा निर्माण करणारे आहेत.त्यातून अनेकांना सामाजिक क्षेत्रात संधी मिळत असते." आमदार शंकर जगताप म्हणाले, "या गणेश उत्सवातून समाजाची एकरुपता गणेशोत्सवातून दिसून येते. सर्व जाती, धर्म, पंथातील लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो. गणेश मंडळांनी चांगल्या प्रकारचे सार्वजनिक उपक्रम राबवून समाजात एकोपा रहावा यासाठी प्रयत्न करावेत". 

ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी प्रास्ताविक केले‌. सन १८९३ साली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. याच्या माध्यमातून समाज संघटित करण्याचे कार्य होत असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना सांगितले. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.