कोंढवा बुद्रुक ग्रामस्थांनी यंदाही जपली शंभर वर्षाची परंपरा!
आळंदी येथील वारकऱ्यांना पितृपक्षातील द्वादशीला भोजनदानाची परंपरा : पुणे झेडपीचे माजी अध्यक्ष जालींदर कामठे यांचा पुढाकार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १८ सप्टेंबर २०२५ :- पितृपक्षातील द्वादशीला आळंदीत जाऊन तेथील वारकऱ्यांना भोजनदान करण्याची परंपरा कोंढवा बुद्रुक (ता. हवेली) येथील ग्रामस्थ कायम जपत आले आहेत. मागील १०० वर्षांपासून अखंडपणे ही भोजनदानाची परंपरा चालू आहे. या परंपरेनुसार यंदाही कोंढवा बुद्रुक येथील ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.१८ सप्टेंबर) आळंदीत जाऊन तेथील वारकऱ्यांना भोजनदान केले आणि यापुढेही ही परंपरा अखंडीतपणे पुढे चालू ठेवण्याचा संकल्प केला.
दरवर्षी पितृपक्षातील एकादशीनंतर येणाऱ्या द्वादशीला वारकऱ्यांना भोजनदान देण्याची ही परंपरा चालू आहे. यानुसार यंदाचा हा भोजनदान कार्यक्रम गुरुवारी करण्यात आला. यासाठी कोंढवा बुद्रुक ग्रामस्थ हे गुरुवारी सकाळीच आळंदी येथे वारकरी बांधवांसाठी भोजनदान कार्यक्रमासाठी पोहोचले. यानुसार आज सकाळपासूनच वारकऱ्यांना भोजन व पाण्याची सोय करून धार्मिक परंपरा जपण्यात आली. या उपक्रमात कोंढवा बुद्रुक ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या समाजोपयोगी कार्याची परंपरा जपत कोंढवा येथील ग्रामस्थांनी पितृपक्षातील बारस आळंदी येथे वारकऱ्यांना भोजनदान करत मोठ्या उत्साहात साजरी केली. या उपक्रमामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. द्वादशीच्या दिवशी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम धर्मभावनेतून पार पडला. भोजनदानाच्या या सेवेत कोंढवा बुद्रुक ग्रामस्थ स्वयंसेवक म्हणून उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालींदर कामठे, गणेश कामठे, शिवाजीराव मरळ, भरत धर्मावत, शिवाजी बधे, ज्ञानेश्वर कामठे, अनिल कामठे, बजरंग वाघ, सुखदेव लोणकर, बाळासाहेब ठोसर, ज्ञानेश्वर कामठे, नानासाहेब मरळ, सोमनाथ कामठे, अमर कामठे, अर्जुन वाघ, चंद्रकांत गायकवाड, भरत पांगारे, संभाजी कामठे, शिरीष धर्मावत, शाम मरळ, चंद्रकांत कामठे राजेंद्र कामठे आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
