Pune zp teachers unique programme: भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानचा उपक्रम प्रेरणादायी : पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचे गौरवोद्गार!
पुणे झेडपी गुरूजींच्या भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप : गेल्या ९ वर्षांपासून अखंडितपणे उपक्रम सुरू
ग्रामराज्य वृत्तसेवा
आंबेगाव/पुणे, दि. २२ जून २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांनी निराधार, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी सुरू केलेल्या भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानच्यावतीने यंदा १०० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे-पाटील यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले. भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानचा हा उपक्रम खुपच प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी यावेळी बोलताना काढले. या उपक्रमाचे यंदा नववे वर्ष आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास अधिक सक्षम आणि आत्मविश्वासपूर्वक व्हावा तसेच कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानने हा उपक्रम सुरू केलेला आहे. हा उपक्रम प्रेरणादायी असून विद्यादान हेच सर्वश्रेष्ठ दान, या भावनेतून समाजहितासाठी असे उपक्रम सातत्याने राबविले पाहिजेत, अशी अपेक्षाही विवेक वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित 'एक हात मदतीचा,आधार निराधारांना' या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमात आदिवासी भागातील अनाथ, निराधार,गरजू तसेच कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी धाराशिव जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील, आंबेगाव पंचायत समितीचे सभापती कैलास काळे, उपसभापती ज्योती पारधी, जिल्हा परिषद सदस्या शिला लोहकरे, सुवर्णा दरेकर, पंचायत समिती सदस्य संजय गवारी, निलेश टेमकर, उद्योजक सुनिल गावडे, गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका,सचिन लोखंडे, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, ग्रामविकास विभागाचे माजी उपसचिव डी.बी.बोऱ्हाडे आदी उपस्थितीत होते.
दरम्यान, भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानने खऱ्या अर्थाने निराधारांना आधार देण्याचे कार्य हाती घेतले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात पालकत्व गमावलेल्या निराधार मुलांना आधार देण्याचे कार्य हे खरे मूल्यशिक्षण आहे. आयुष्यात एका दुःखी व्यक्तीचे अश्रू पुसण्याची संधी मिळाली तरी आपले जीवन सार्थकी लागले, असे समजावे, असे मत धाराशिव जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानचे संस्थापक दत्तात्रेय वाळुंज, अध्यक्ष नंदकुमार येवले, सचिव मच्छिंद्र झांजरे, नारायण काळे, सुनिल पाटील, सुनील बुरसे, सुरेंद्र डोके,किसन शिंगाडे, किसन कोंढवळे,आनंद संत, प्रदिप चासकर आदींनी सन २०१७- १८ पासून हा उपक्रम सुरू केला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेंद्र डोके यांनी तर, सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले. मच्छिंद्र झांजरे यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा भीमाशंकर मंदिराची छायाकृती देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला खरेदी विक्री संघाचे संचालक मधुकर बोऱ्हाडे, आंबेगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष संजय आर्विकर, विस्तार अधिकारी संचिता अभंग, कल्पना टाकळकर,पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे माजी सरचिटणीस चांगदेव मसुरकर, माजी अध्यक्ष महेंद्र सावंत, सामाजिक कार्यकर्ते गणपत ढेरंगे, युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खरात, देखरेख संघाचे संचालक भरत फदाले, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक आनंद राक्षे, बोरघरचे सरपंच विजय जंगले, फुलवडेचे सरपंच बबन मोहरे, माजी सरपंच सुभाष जंगले, शिनोलीचे उपसरपंच गणेश बोऱ्हाडे, कानसे गावच्या सरपंच सविता वाळुंज,आत्माराम बोऱ्हाडे, युवा नेते निलेश बोऱ्हाडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महेश बढे, पेन्शनर संघटनेचे ज्ञानेश्वर थोरात, गंगाधर काळे, पुणे जिल्हा आदिवासी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र लोहकरे, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष संजय हुले, आंबेगाव तालुका शिक्षक संघाचे नेते विजय घिसे, शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळकंदे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष विनोद ढोबळे, शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष तुषार शिंदे, शिक्षक पतसंस्थेचे सभापती कान्होबा डोंगरे,संचालक बाळासाहेब साबळे, विकास बाणखेले, दत्ता मेचकर आदी उपस्थित होते.
आंबेगाव पंचायत समितीतील अधीक्षक मच्छिंद्र मडके, माजी विस्तार अधिकारी काळूराम भवारी, केंद्रप्रमुख मच्छिंद्र काळे, सुरेश रोंगटे, स्मिता चासकर, पंकजा हगवणे,स्मिता काळे, सर्व शिक्षा अभियानातील ज्योत्स्ना माशेरे, योगेश देशमुख, नारायण चित्ते,वनिता खराडे, विद्या भास्कर, राजेश मंदावार, छाया केदारी,स्वाती पडवळ आदी कर्मचारी उपस्थित होते.
'साईबाबाज' या जर्मन भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन
या समारंभात राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक नंदकुमार येवले यांच्या साईबाबाज या जर्मन भाषेतील अनुवादित पुस्तकाचे व आदर्श शिक्षक मच्छिंद्र झांजरे यांच्या उत्कर्ष विचार या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील समाधान हीच या उपक्रमाची पावती आहे. समाजातील वंचित व घटकांना आधार देत शिक्षणाच्या माध्यमातून उज्वल भविष्य घडविण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे.
- विवेक वळसे पाटील,
उपाध्यक्ष तथा सभापती, शिक्षण व अर्थ समिती,
जिल्हा परिषद, पुणे.
