State Agriculture Day : कृषी दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेत 'भविष्यातील शेती' विषयावर निबंध लेखन स्पर्धा!

पुणे झेडपीचे कृषी सभापती अमोल नलावडे : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीदिनी पारितोषिक वितरण 

State Agriculture Day : कृषी दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेत 'भविष्यातील शेती' विषयावर निबंध लेखन स्पर्धा!

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ३० जून २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्य कृषी दिनानिमित्त (दि.१ जुलै) 'भविष्यातील शेती' या विषयावर जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इयत्ता चौथीच्या वर्गापासून पुढील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. 

या निबंध स्पर्धेत प्रत्येक वर्गातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या येत्या जयंतीदिनी (दि.२२ जुलै) पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे यांनी सांगितले. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे जनक दिवंगत वसंतराव नाईक यांचा जन्मदिन (दि.१ जुलै)हा राज्य कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या कृषी दिनाच्या निमित्ताने येत्या बुधवारी (दि.१ जुलै) समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या समारंभाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती दिपाली हुलावळे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे, समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.