PDCC Bank Clerk recruitment interview : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लेखनिक पदाच्या भरतीसाठीच्या मुलाखतींना सुरूवात!
जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची माहिती ;मुलाखतीसाठी १०७१ उमेदवार पात्र : मुलाखतीच्या एकूण १० पैकी ५ गुण शैक्षणिक अर्हतेला देणार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १३ जून २०२६ :- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) लेखनिक पदाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत या मुलाखतीसाठी १०७१ पात्र उमेदवारांना बोलावण्यात आले आहे. या मुलाखती घेण्यास शुक्रवारपासून (दि.१२ जून) सुरुवात झाली आहे.येत्या सोमवारी (दि.१५ जून) या मुलाखती संपणार आहेत. या मुलाखतीसाठी एकूण १० गुण असून, त्यापैकी ५ गुण शैक्षणिक अर्हतेसाठी दिले जाणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक व राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे, बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक संभाजी होळकर आणि प्रभारी मुख्य कार्यकारी संजय शितोळे आदी उपस्थित होते.
जिल्हा बँकेच्या लिपिक पदाच्या भरतीसाठी दि. ७ ऑगस्ट २०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी एकूण ३१ हजार ३१२ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. यापैकी ३१ हजार २६६ उमेदवार ऑनलाइन परीक्षेसाठी पात्र ठरले होते. पात्र उमेदवारांची महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) या संस्थेच्या वतीने दि. २२ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान, या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा बँकेच्या संकेतस्थळाव फॉर्म आणि आसन क्रमांकनिहाय जाहीर करण्यात आली होती, असे प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेत लेखनिक पदाच्या ३५६ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी या मुलाखती घेण्यात येत आहेत. मुलाखतीनंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे. या पदाच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना ईमेल किंवा मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे. कागदपत्रे पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या जिल्हा बँकेने गठित केलेल्या समितीकडून मुलाखती घेण्यात येत आहेत.
राज्य सरकारच्या दि. ०८ मे २०२६ च्या शासन निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाचा उमेदवारांकरिता एकूण जागांपैकी ७० टक्के जागा या राखीव असणार आहेत. अन्य ३० टक्के जागा या पुणे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरीता राखीव असणार आहेत.
शैक्षणिक अर्हतेनुसार दिले जाणारे गुण (पाच पैकी)
- उमेदवारांकडे कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी असल्यास --- १ गुण.
- विशेष पदवी (बी. कॉम, बी. एस्सी (ॲग्री.), बी.व्ही.एस.सी. ॲंड ए.एच., बी.ई., बी. टेक. (कॉम्प्युटर), आय.टी., बी. सी.एस. , बी.बी.ए., एल.एल.बी.) --- १ गुण.
- एच.डी.सी.एम./डी.सी.बी.एम. --- १ गुण.
- जी.डी.सी.ॲंड ए. --- १ गुण.
- मराठी व इंग्रजी टायपिंग, स्टेनोग्राफर (शासकीय प्रमाणपत्र) --- १ गुण.
