Pune zp m.m. kureshi : पुणे झेडपीच्या नवीन इमारतीचे बांधकाम व फर्निचरच्या कामात सिंहाचा वाटा असणारे शाखा अभियंता मोहम्मद कुरेशी सेवानिवृत्त! 

झेडपीच्या बांधकाम विभागातर्फे कुरेशी यांना निरोप : पुणे झेडपीत तब्बल १८ वर्ष सांभाळली इमारत देखभाल व दुरूस्ती विभागाच्या प्रकल्प अधिकारी पदाची जबाबदारी 

Pune zp m.m. kureshi : पुणे झेडपीच्या नवीन इमारतीचे बांधकाम व फर्निचरच्या कामात सिंहाचा वाटा असणारे शाखा अभियंता मोहम्मद कुरेशी सेवानिवृत्त! 
पुणे:- पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे हे सेवानिवृत्तीनिमित्त एम.एम. कुरेशी यांचा सत्कार करताना. यावेळी बांधकाम विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ३१ मे २०२६ :- पुणे जिल्हा परिषद मुख्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामात व या इमारतीतील सर्व फर्निचर करण्यात सिंहाचा वाटा असलेले बांधकाम विभागातील शाखा अभियंता मोहम्मद मुजफ्फर कुरेशी हे अडीच दशकांच्या सेवेनंतर रविवारी (दि.३१ मे) सेवानिवृत्त झाले. पुणे जिल्हा परिषदेत कुरेशी हे एम. एम. कुरेशी या नावाने ओळखले जात असत.जिल्हा परिषदेतील सेवेच्या एकूण कार्यकाळांपैकी सुमारे १८ वर्ष इतकी प्रदिर्घ काळ त्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या इमारत देखभाल व दुरूस्ती विभागाचे प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यामुळे इमारत देखभाल व दुरुस्ती आणि कुरेशी असे समिकरण बनले होते. 

दरम्यान, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी सेवानिवृत्तीनिमित्त कुरेशी यांचा सत्कार केला.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्यावतीने एका छोटेखानी समारंभात कुरेशी यांना निरोप देण्यात आला. 

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे सन १९९३ मध्ये झालेल्या भुकंपानंतर कुरेशी यांनी लातूर जिल्ह्यात सुमारे पाच वर्षे भुकंप पुनर्वसन विभागात काम केले. त्यानंतर सन २००१ मध्ये ते पुणे जिल्हा परिषदेच्या सेवेत दाखल झाले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता या पदावर रूजू झालेले कुरेशी यांना इंदापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभागात पहिली पोस्टिंग मिळाली होती.

इंदापूर पंचायत समितीत सुमारे वर्षभर काम केल्यानंतर सन २००२ मध्ये त्यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात देखभाल व दुरुस्ती या विभागात बदली झाली. तेव्हापासून (सन २००२) ते सन २०१७ पर्यंत कुरेशी हे याच विभागात कार्यरत होते. सन २००६ मध्ये त्यांना कनिष्ठ अभियंता या पदावरून शाखा अभियंता या पदावर पदोन्नती मिळाली. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाच्या नवीन इमारतीच्या कामाला खऱ्या अर्थाने २००६ नंतरच गती मिळाली आणि हे काम पूर्ण होऊन जिल्हा परिषद मुख्यालयाचे सन २००९ मध्ये नवीन इमारतीत स्थलांतर झाले. 

दरम्यान, कुरेशी यांची सन २०१७ मध्ये हवेली पंचायत समिती आणि सन  २०२० मध्ये मुळशी पंचायत समितीत बदली झाली. सन २०२३ मध्ये पुन्हा जिल्हा परिषदेच्या देखभाल व दुरुस्ती विभागाचे शाखा अभियंता (प्रकल्प अधिकारी) या पदावर बदली झाली आणि याच पदावरून रविवारी ते सेवानिवृत्त झाले. एम. एम. कुरेशी हे मुळचे मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाईचे. सध्या प्रचलित असलेला लातूर पॅटर्न हा मुळचा अंबाजोगाईचाच. भारतीय स्वातंत्र्यापूर्वी सन १९३५ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी नूतन विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंबाजोगाई येथील शासकीय तंत्रनिकेतन (Polytechnic) विद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकी शाखेची पदविका प्राप्त केली. 

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत असताना कुरेशी यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मिळालेला आहे. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी फर्निचर पुरवठा,मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेचे नवीन इमारत संकुल,पुरंदर पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी फर्निचर पुरवठा आणि मुळशी पंचायत समितीच्या नवीन सभागृहाचे (Auditorium) काम हे कुरेशी यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले आहे.

वडील बीड झेडपीचे माजी सदस्य 

दरम्यान, एम. एम‌. कुरेशी यांचे वडील मुजफ्फर कुरेशी हे अंबाजोगाई येथील नामवंत वकील. अंबाजोगाई येथील तालुका आणि जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय करत असतानाच वडिलांनी बीड जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली आणि या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यामुळे कुरेशींचा पहिल्यापासूनच जिल्हा परिषद कामकाजाशी संबंध आलेला. वडील सध्या बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत.