Ramai gourav award : सामाजिक कार्यकर्त्या प्रा. मीरा अय्यंगार-मानखेडकर यांना रमाई गौरव पुरस्कार!
पुणे येथील रमाई महिला चळवळीच्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ३१ मे २०२६ :- पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रा. मीरा अय्यंगार-मानखेडकर यांना रमाई गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील १२ व्या रमाई महिला चळवळीच्या साहित्य संमेलनात या संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या हस्ते प्रा. मिरा अय्यंगार-मानखेडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमाताई आंबेडकर, ज्येष्ठ दलित साहित्यिक आणि 'गीत व नाटक विभागाचे (Song and Drama Division) संचालक डॉ. विजयकुमार गवई, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदाडे, केंद्रीय युवक कार्य व क्रीडा मंत्रालयाचे निवृत्त संचालक यशवंत मानखेडकर व वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली रणधीर आदी उपस्थित होते.
या पुरस्काराच्या मानकरी प्रा. मिरा अय्यंगार-मानखेडकर यांचा यांचा जन्म साऊथ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पाचगणी येथील न्यू एरा आंतरराष्ट्रीय शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील साधू वासवानी मिशनच्या सेंट मीरा कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतर त्यांनी मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून (TISS) समाज विकास आणि समाजकार्य (MSW) या विद्या शाखेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
पदव्युत्तर पदवीनंतर त्यांनी ‘कास्ट प्लॅन इंटरनॅशनल’ या प्रकल्पामध्ये काम केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून गरीब व वंचित कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी परदेशी दत्तक पालक योजनेतून मदत करण्यात आली. या उपक्रमातून दोन हजारांहून अधिक मुलांना सहकार्य मिळाले.
त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे यशवंत कांबळे- मानखेडकर यांच्याशी झालेला विवाह हा आहे. सामाजिक विरोध पत्करून त्यांनी सन १९९१ मध्ये यशवंत मानखेडकर यांच्याशी बौद्ध पद्धतीने विवाह केला. विवाहपूर्वी त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा स्वीकार केला आणि इगतपुरी येथील जागतिक ख्यातीच्या विपश्यना केंद्रात दहा दिवसांचे ध्यानसाधना शिबिर पूर्ण केले. त्यानंतर त्या बौद्ध उपासिका म्हणून समाजात सक्रिय राहिल्या.
सन १९९४ मध्ये त्यांचे पती यशवंत मानखेडकर यांची केंद्र सरकारमध्ये वर्ग-एक अधिकारी म्हणून नियुक्त झाली. पतीच्या नोकरीच्या निमित्ताने त्यांनी काही काळ कोल्हापूर येथे वास्तव्य केले. त्यांनी कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज व्यवस्थापन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सहा वर्षे काम केले. या काळात त्यांनी समाजकार्य, समाज विकास व मानव विकास या विषयांवर दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर सातारा येथील यशवंतराव चव्हाण समाज विज्ञान संस्थेत, प्रा. लक्ष्मण माने यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य या विद्या शाखेच्या विद्यार्थ्यांना समाजकार्याचे शिक्षण व प्रशिक्षण दिले. त्यांनी येथेही सुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी मेडिकल सायकेट्रिक सोशल वर्क या विशेष शाखेत प्रशिक्षण दिले. यानंतर त्यांनी न्यू एरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी समुपदेशन व मार्गदर्शन केले.
याशिवाय प्रा. अय्यंगार यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ( Tata Consultancy Services) या आंतरराष्ट्रीय कंपनीबरोबर Affirmative Action’ या उपक्रमात काम केले. या उपक्रमाद्वारे वंचित, बहुजन आणि दलित समाजातील पहिल्या पिढीतील पदवीधर मुला-मुलींना रोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून त्यांनी सुमारे तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
बौद्ध उपासिका म्हणून त्यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सुमारे ४० वर्षे समाजकार्य व लोकसेवा केली. त्यांनी बुद्धांच्या प्रज्ञा, करुणा आणि समता या मूल्यांचा अंगीकार करून समाजात शांतता व सहिष्णुतेचा संदेश दिला. तसेच आपल्या कुटुंबालाही बुद्धांच्या विचारांवर चालवले. त्यांच्या दोन मुली उच्चशिक्षित असून एक सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे, तर दुसरीने महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्तीवर ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.
रमाई गौरव पुरस्काराच्या अन्य मानकरी
रमा आंबेडकर (मुंबई), सीमा भालेसईन (पुणे),ॲड. जयश्री भगत (छत्रपती संभाजीनगर), निरंजना आवटे (नांदेड), उज्वला गणवीर (नागपूर), सुरेखा पैठणे (ठाणे), शिल्पा कांबळे (मुंबई), ॲड. इंदूमती वराळे (छत्रपती संभाजीनगर), वनश्री वनकर (पुणे), आशा डांगे (छत्रपती संभाजीनगर), डॉ. अंजली अभ्यंकर (पुणे), प्रा. रमणी बबिता आकाश (पुणे), प्रांजली वाणी (पुणे), सुरेखा युवराज बर्वे (नाशिक), निशा पंडित (इगतपुरी), सुनिता सोनवणे (सोलापूर), सुजाता ओव्हाळ (पुणे), शीतल साठे (पुणे), चित्रा कुहे (नाशिक), डॉ. सुनिता बोर्डे (सांगली), ॲड. गायत्री कांबळे (पुणे), प्रज्ञा बोदडे (पुणे), प्रज्ञा जाधव (मुंबई), कल्पना दिवेकर (घोटी), प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर (पुणे), रूपा धांडे (पुणे), डॉ. यशोधरा सोनवणे (पुणे), कमल वानखडे (अकोला), अस्मिता दिघे (कोल्हापूर), करूणा जाधव (छत्रपती संभाजीनगर).
