The Soaring Ambitions of Orphaned Girls : पुण्यातील अनाथ मुलींची 'ग्लायडर'द्वारे गगनभरारी!

ग्लायडिंग सेंटरचे संचालक कॅप्टन शैलेश चारभे यांच्याकडून अनाथ मुलींना अनोखी 'भेट'

The Soaring Ambitions of Orphaned Girls : पुण्यातील अनाथ मुलींची 'ग्लायडर'द्वारे गगनभरारी!

प्रा. मीरा बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २५ ऑक्टोबर २०२६ :- पुण्यातील हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरचे संचालक कॅप्टन शैलेश चारभे यांनी त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत, समाजाला एक नवा आदर्श घालून दिला. केक कापून वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत, त्यांनी पुण्यातील अनाथ मुलींना गगनभरारीची अनोखी भेट देण्याचा निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षातही आणला. या अनाथ मुलींची 'ग्लायडर'द्वारे हवाई सफर घडवून आणली. 

यावेळी सीमा सुरक्षा दलातील सेवानिवृत्त महानिरीक्षक कॅप्टन प्रदीप किशन वहाल हेही उपस्थित होते. भारत सरकारचे पुण्यातील हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरचे संचालक कॅप्टन शैलेश चारभे, जनसेवा फाऊंडेशन आणि ग्लायडिंग सेंटरच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे येथील जनसेवा फाऊंडेशनच्या भिलारेवाडी येथील अनाथ व निराधार पुनर्वसन केंद्रातील अनाथ मुलींनी ग्लायडरद्वारे आकाशात भरारी घेत, हवाई सफरीचा आनंद घेतला. हा खुपच आगळावेगळा आणि अनोखा उपक्रम असल्याचे मत या अनाथ मुलींनी  यावेळी प्रतिक्रिया देताना व्यक्त केले आणि ग्लायडिंग सेंटरचे संचालक कॅप्टन शैलेश चारभे यांचे आभार मानले.

दरम्यान, या कार्यक्रमात कॅप्टन वहाल यांनी मुलींसाठी लष्करातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी या अनाथ मुलींना लष्कर आणि पोलिस दलातील आणि अन्य महत्त्वाच्या विभागात असलेल्या नोकरीच्या संधी याबाबत माहिती दिली.  समाजातील दुर्बल घटकांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 'ग्लायडिंग'द्वारे घेतलेल्या गगन भरारीतून प्रेरणा घ्या.जेणेकरून या प्रेरणेतून प्रोत्साहन मिळेल आणि भविष्यात आपण सर्वजणी यशस्वी व्हाल, असा सल्ला त्यांनी यावेळी या अनाथ मुलींना दिला.

याशिवाय कॅप्टन चारभे यांचे विद्यार्थी जयेश चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. कॅप्टन चारभे हे केवळ पायलट नसून ते एक प्रेरणादायी गुरू व मार्गदर्शक आहेत. त्यांचे मार्गदर्शन, अनुभव, धैर्य आणि स्नेह हा कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी अमूल्य ठेवा असल्याचे जयेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्लायडिंग सेंटरमधील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.