Zp school started : पुणे झेडपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाच वर्षांच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच साजरा केला जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांबरोबर शाळेचा पहिला दिवस! 

जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांकडून नवागतांचे स्वागत, मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप : सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू

Zp school started : पुणे झेडपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाच वर्षांच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच साजरा केला जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांबरोबर शाळेचा पहिला दिवस! 
पुणे:- जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके वाटप करताना जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १५ जून २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि.१५ जून) तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी आणि झेडपी सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेचा पहिला दिवस साजरा केला. सोमवारी चालू शैक्षणिक वर्षाच्या जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी आपापल्या जिल्हा परिषद गटातील झेडपी शाळांना भेटी देत नवागतांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. 

दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दौंड तालुक्यातील आलेगावच्या धुमाळवस्ती शाळेला तर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे-पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द जिल्हा परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 

पुणे जिल्हा परिषदेवर दि. २१ मार्च २०२२ ते दि. १७ मार्च २०२६ या कालावधीत प्रशासकराज होते. जिल्हा परिषदेच्या शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष हे दरवर्षी दि. १५ जूनपासून सुरू होते. यामुळे याआधीच्या दि. १५ जून २०२२, दि. १५ जून २०२३, दि. १५ जून २०२४ आणि दि. १५ जून २०२५ या चार शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवोगतांचे स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य नव्हते. त्यानंतर दि. १८ मार्च २०२६ पासून जिल्हा परिषदेचे नवे सभागृह अस्तित्वात आले आहे. त्यामुळे प्रदीर्घ खंडानंतर यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांना आपापल्या मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमधील नवोगतांचे स्वागत करण्याची संधी मिळाली. 

धुमाळवस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांना 'दादा'नंतर  भेटले 'बाबा'! 

नवोगत म्हटलं की, स्वतःच्या घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडल्यानंतर शाळेच्या उंबरठ्यावर पहिल्यांदा पाऊल ठेवणारे अवघ्या सहा वर्षे वयाचे बालक होय. या वयात आई-वडिल आणि नातेवाईक वगळले अन्य जगाशी काही देणंघेणं नसतं. पण शाळेच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने पहिल्यांदाच शाळेचे गुरूजी व त्यानंतर नवोगतांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांना पाहण्याची संधी या बालकांना मिळत असते. यानुसार दौंड येथे धुमाळ वस्ती शाळेचे नवोगत सलग दुसऱ्या वर्षी लक्की ठरले आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांचे गेल्या वर्षी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी स्वागत केले होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात याच शाळेतील विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी स्वागत केले. दिवंगत अजित पवार हे 'दादा' या टोपणनावाने ओळखले जात तर, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे हे 'बाबा' या टोपणनावाने ओळखले जातात. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना 'दादा'नंतर 'बाबां'ना भेटण्याची संधी मिळाली.