Cluster zp school :  पानशेत आणि वाडा येथील शाळांच्या धर्तीवर झेडपी समूह शाळा (क्लस्टर स्कूल) निर्माण करणार! 

जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांची संयुक्त घोषणा 

Cluster zp school :  पानशेत आणि वाडा येथील शाळांच्या धर्तीवर झेडपी समूह शाळा (क्लस्टर स्कूल) निर्माण करणार! 
पुणे:- जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १५  जून २०२६ :- पुणे जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांवरील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. परिणामी जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक वाड्या-वस्त्यांमधील झेडपी शाळांची पटसंख्या ही दहाच्या आत आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोणीही जिल्हा परिषद शाळेअभावी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी वेल्हे (राजगड) तालुक्यातील पानशेत आणि खेड (राजगुरुनगर) तालुक्यातील वाडा या दोन समूह शाळांच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यात आणखी काही समूह शाळा (क्लस्टर स्कूल) निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी सोमवारी (दि.१५ जून) संयुक्तपणे केली. 

यानुसार वेल्हे तालुक्यातील पासली या गावात पुणे जिल्ह्यातील तिसरी समूह शाळा निर्माण करण्याचे विचाराधीन असल्याचेही अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती ‌अमोल नलावडे हे उपस्थित होते. 

या समूह शाळांमध्ये संबंधित शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळांचे समायोजन केले जाईल. या संभाव्य समूह शाळांमध्ये समाविष्ट वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना या  समूह शाळांमध्ये वर्ग केले जाईल आणि या वर्ग केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाणे-येणे करण्यासाठी खास स्कूल बसची सोय केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पुणे जिल्ह्यातील विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) या स्कूल बसेस उपलब्ध करून घेण्यात येणार असून, यासाठीचा इंधन खर्च हा जिल्हा परिषदेमार्फत केला जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील पहिली समूह शाळा (क्लस्टर स्कूल) वेल्हे तालुक्यातील पानशेत येथे सुरू करण्यात आली आहे. या शाळेसाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेतला होता. 

पानशेतच्या समूह शाळेचा प्रयोग यशस्वी - अमोल नलावडे 

पुणे जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात आतापर्यंत दोन समूह शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी पानशेत येथील समूह शाळेबाबत नकारात्मक चर्चा केली जात असली तरी, त्यात फारसे तथ्य नाही. ही शाळा यशस्वीपणे सुरू असल्याचे या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे यांनी यावेळी सांगितले. 

झेडपीच्या २६ शाळांमध्ये इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरू 

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २६ शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यापैकी सतरा शाळांमध्ये इयत्ता पाचवीचे आणि नऊ शाळांमध्ये इयत्ता आठवीचे वर्ग आहेत. याशिवाय अन्य दोन शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावी, तीन शाळांमध्ये सहावी आणि एका शाळेत नववीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे.