जागतिक दिव्यांग दिन विशेष :- Shadow of the Disabled: Surekha Dhawale :- पुणे जिल्ह्यातील 'माऊली' बनली राज्यातील दिव्यांगांची 'सावली'!

दिव्यांग सुरेखा ढवळे यांचा संघर्षमय जीवनप्रवास : स्वतः निराधार, दिव्यांग असतानाही बनल्या सर्व दिव्यांगांचा 'आधार'

जागतिक दिव्यांग दिन विशेष :- Shadow of the Disabled: Surekha Dhawale :-  पुणे जिल्ह्यातील 'माऊली' बनली राज्यातील दिव्यांगांची 'सावली'!
पुणे:- राज्यातील दिव्यांगांची 'सावली': सुरेखा ढवळे

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ३ डिसेंबर २०२५ :-  जन्मतः दिव्यांग, घरची आर्थिक परिस्थिती बेताची, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच आईचे निधन आणि आईच्या निधनानंतर एका महिन्यात लग्न झाल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागले. दिव्यांग असल्याने आधीच विवाहित आणि दोन मुलांचा बाप असलेल्या मद्याचे व्यसन असलेल्या व्यक्तीशी लग्न करावे लागले. मात्र या व्यसनी नवऱ्याने दिव्यांगत्वाचे कारण देत, लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच सोडून दिले‌.

यामुळे त्यांना एक वर्ष वयाच्या मुलीसह रस्त्यावर यावे लागले. दोघी मायलेकी निराधार झाल्या. पण त्यानंतर मोलमजुरी करत आणि संसाराचा गाडा हाकत हाकत त्यांनी राज्यातील दिव्यांगांना मदत करण्यास  सुरुवात केली व आतापर्यंत हजारो दिव्यांगांना आधार दिला.ही काही एखाद्या चित्रपटाची कथा किंवा काल्पनिक कथा नसून एका दिव्यांग व निराधार महिलेचा संघर्षमय जीवन प्रवास आहे. ही महिला पुणे जिल्ह्यातील असून, त्या राज्यातील दिव्यांगांची सावली बनल्या आहेत. सुरेखा विठ्ठल ढवळे असे महिलेचे नाव आहे‌. 

सुरेखा विठ्ठल ढवळे या मुळच्या पुरंदर तालुक्यातील भिवरी गावच्या.भिवरी हे सासवडपासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेलं ६०० उंबऱ्यांचं गाव‌. या गावची लोकसंख्या जेमतेम तीन हजारांच्या घरात. पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागात हे गाव आहे. भिवरी गावच्या सुरेखा विठ्ठल ढवळे यांनी राज्यातील हजारो दिव्यांगांना कोट्यावधी रुपयाची आर्थिक मदत मिळवून दिली आहे.  समाजातील अंध, अपंग, विधवा, कर्णबधिर, परितक्त्या, एकल आणि वृद्ध महिलांना सरकारी अनुदान मिळवून देणे, दिव्यांगांना घरकुल मिळवून देणे आदी कामे त्या करत आहेत‌. 

लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच सुरेखा ढवळे यांना पतीने घराबाहेर काढले. कोणताही आधार नसताना मोलमजुरी करून स्वतःच्या एका वर्षाच्या मुलीला वाढविले.  त्यानंतर आपल्यावर अन्याय झाला असला तरी, यापुढे अशा अपंग, अनाथ, विधवा, वृद्ध,  एकल महिलांवर आणि व्यक्तींवर अन्याय होता कामा नये, ही खूणगाठ मनाशी बांधून त्यांनी सामाजिक कार्यात  सहभाग घेण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे नेते आणि अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांच्याशी त्यांचा संपर्क झाला आणि जीवनाची संपूर्ण दिशा बदलली. दिव्यांगांना घरकुल मिळवून देणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पाच टक्के निधी, संजय गांधी पेन्शन योजना शिधापत्रिकांच्या बाबतीत महिलांवर होणाऱ्या अन्यायाबाब आवाज उठवणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, दिव्यांगांचा निधी योग्य कारणासाठी खर्च व्हावा,यासाठी सरकारी अधिकारी, राजकीय पदाधिकारी यांच्याबरोबर वेळप्रसंगी संघर्ष करून लाभ मिळवून देणे आदी कामे करण्यास त्यांनी सुरुवात केली. 

अल्पावधीतच पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या, नगरपालिका व जिल्हा परिषदेसमोर दिव्यांगांना बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. परिणामी दिव्यांगांना आपल्या हक्काची जाणीव तर झालीच. त्याचबरोबर त्यांना लाभही मिळत गेले. ढवळे यांनी आतापर्यंत राज्यातील विविध जिल्हा परिषदांसमोर आंदोलन केले आहे. त्यांनी आतापर्यंत दिव्यांगा़साठी केलेल्या आंदोलनामुळे पुर्वी दिव्यांगांना मिळणारी ६०० रुपयांची पेन्शन आता अडीच हजार रुपये झाली आहे.

शेतकरी, अनाथ, दिव्यांग विधवा महिला यांच्यासाठी केलेल्या विविध आंदोलनांमुळे त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. पण त्या तसूभरही मागे हटल्या नाहीत.दिव्यांगांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी प्रशासनाची कायम दोन हात केले. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही आंदोलन करून दिव्यांगांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या या  प्रयत्नातून दिव्यांगांसाठी तब्बल दीडशे शासन निर्णय प्रसिद्ध झाले आहेत‌. शिवाय स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती, यामध्ये सुरेखा ढवळे यांचा वाटा आहे.

पुरंदर तालुक्यातील भिवरी हे सासर तर, तक्रारवाडी  हे सुरेखा ढवळे यांचे माहेर.त्या जन्मजात अस्थिव्यंग आहेत. अपंगत्व ७२ टक्के आहे. त्या डाव्या पायाने दिव्यांग असून त्यांचा डावा पाय उजव्या पायापेक्षा तीन इंच कमी आहे. यामुळे त्यांना धड मांडी घालून बसताही येत नाही. त्यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण तक्रारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. त्यानंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे शिक्षण शिवरी येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालयात झाले. तक्रारवाडी पासून शिवरी हे तीन ते चार किलोमीटरचे अंतर रोज पायी चालत जाऊन शिक्षण घेतले. यासाठी सासवड-जेजुरी महामार्गावरून प्रवास करावा लागत असे. पायाला होणारा त्रास, पाठीवर दप्तराचे ओझे आणि जेजुरी-सासवड रोडवर वाहणाऱ्या वाहनांमुळे होणारा त्रास सहन होत नसल्याने शिवरीची शाळा बदलावी लागली. नववी व दहावीचे शिक्षण साकुर्डे येथील विद्यालयात घेतले.

दरम्यान, दहावीचे शिक्षण घेत असतानाच आईचे निधन झाले. कुटुंबात वडील व सुरेखा ढवळे यांच्यासह सहा बहिणी व एक भाऊ असे त्यांचे कुटुंब‌. सुरेखा ढवळे यांची थोरली बहीणही दिव्यांग.अशा कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे आईच्या निधनानंतर सोळाव्या वर्षीच  त्यांचे लग्न झाले. पायात अपंगत्व असल्याने पहिले लग्न झालेल्या व आधीच दोन मुले असलेल्या व्यक्तीशी त्यांचा विवाह लावून देण्यात आला. त्यांचे पती खूप व्यसनाधीन होते. ते मोठ्या प्रमाणात दारू पित असत. ते दारू पिऊन मारहाण व मानसिक छळ करू लागले.

त्यामुळे लग्नानंतर कसा बसा तीन वर्षच संसार चालू राहिला. त्यातच सन 2000 मध्ये मुलगी झाली. त्यानंतर पतीने अपंग असल्या कारणाने सोडून दिले. पदरी एक वर्षाची मुलगी, स्वतः दिव्यांग आणि नवऱ्याचा आधार सुटल्याने त्या रस्त्यावर आल्या. यामुळे मुलीची जबाबदारी खांद्यावर येऊन पडली. राहण्यासाठी घर नाही, कुणाचा आधार नाही, माहेरची परिस्थिती अत्यंत बेताचीच. त्यातच दिल्या घरी नांदायचं. कोणाची आर्थिक मदत नाही. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी एक वर्षाची मुलगी सोबत घेऊन एकटीने संसार सुरू केला.

त्यावेळी शेतात मजुरी करून पंचवीस रुपये मिळायचे. यातच पोट भरत नव्हते. त्यामुळे जास्त पैसे मिळतील, या आशेने बिल्डिंगच्या बांधकामावर वीट व वाळू वाहण्याचे काम करू लागल्या.त्यातून पन्नास रुपये रोज मिळायचा.अशा पद्धतीने येणारा प्रत्येक दिवस पुढे ढकलत होत्या‌. भाड्याचं घर, मुलीचे शिक्षण करत असतानाच सन २०१४ मध्ये पतीचे निधन झाले. पायात अपंगत्व, डोक्यावर पदर, खांद्यावर आलेला विधवेचा शिक्का. यामुळे आता समाज काय म्हणेल, मुलीच्या शिक्षणाचे काय, या प्रश्नांनी त्यांना पछाडले होते.परंतू, परिस्थिती कितीही बिकट असली तरी खचून जायचे नाही. तर लढून त्यावर मात करायची हा निश्चय त्यांनी मनाशी केला. 

त्यानंतर त्यांनी येवलेवाडी येथे सिमेंट व बांधकाम बिल्डिंगवर काम केले. आपले अपंगत्व हे कमजोरी नसून, ती आपली ताकद आहे, असे समजून त्यांनी पुन्हा संसार उभा करण्याचा निश्चय केला. यासाठी अपार कष्ट केले व या कष्टातून मिळालेल्या पैशातून सन २०१६ मध्ये त्यांनी कशीबशी अर्धा गुंठा जागा खरेदी केली. सरकारी घरकुलासाठी प्रस्ताव दाखल केला.मात्र अर्धा गुंठ्या जागेचे खरेदीखत होत नसल्याने तेथेही त्यांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागली. तरीही कसेबसे करुन सरकारी घरकुल मिळवून घेतले. मजुरी करून काही पैसे जमवले आणि मित्रांच्या सहकार्याने घर उभं केलं. जास्तीचे पैसे मिळावे म्हणून शिवणकाम व धुणी-भांड्याची कामे केली. 

स्वतः अपंग असताना कोणताही आधार नसताना परिस्थितीवर मात करून आणि वेळप्रसंगी सरकारशी लढा देऊन पुरंदर तालुक्यातील दिव्यांगांसाठी पुरंदर दिव्यांग औद्योगिक सहकार संस्था स्थापन केली आहे. या संस्थेचे सध्या दोनशे सभासद आहेत. दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कंपनी उभारण्यासाठी सरकारकडे जागा मागणीसाठी प्रस्ताव या संस्थेच्या माध्यमातून दाखल करण्यात आला आहे. हा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. स्वतःचं उत्पन्न जास्त नसल्याने दिव्यांगांसाठी खूप करण्याची इच्छा असूनही पैशा- अभावी व सरकारी अटी शर्तींअभावी काही करता येत नाही, याची खंत सुरेखा ढवळे यांना आहे.

सध्या ढवळे या येवलेवाडी येथील सिंहगड कॉलेजमध्ये मुलींच्या हॉस्टेलच्या रेक्टर म्हणून काम करत आहेत. शिवाय मोकळ्या वेळेत भरतकाम, विणकाम शिलाई मशीन आदी कामे करत आहेत. त्या शूटिंग रायफल चालवण्याच्या स्पर्धेत भाग घेतात. गडकिल्ले चढण्याचा छंद आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई तीन वेळा सर केले आहे.आतापर्यंत ४२ किल्ले सर केले आहेत. त्यांनी २३ वेळा रक्तदान केले आहे. 

दिव्यांगाना समाजामध्ये मानसन्मान व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सन २०१६ च्या  कायद्यांनुसार दिव्यांगांचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाले आहे. यामुळे दिव्यांगांची होणारी फरपट थोडी थांबली आहे. समाजाने दिव्यांगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, त्यांना आत्मनिर्भर करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे, दिव्यांगांना विविध अभ्यासक्रम सुरू करावेत,  दिव्यांग हक्क कायद्यानुसार दिव्यांगांना नोकऱ्यांमध्ये चार टक्के आरक्षण देण्यात यावे, राज्य सरकारने दिव्यांगांसाठी कायदे व शासन निर्णय केले आहेत, त्याची काटेकोरपणाने अंमलबजावणी करावी, सरकारने दिव्यांगाना आत्मनिर्भर बनवावे, दिव्यांगांना समान संधी, समान हक्काचे संरक्षण देण्यात यावे व दिव्यांगाकडे पाहण्याचा  दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न करावेत आदी अपेक्षा जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने सुरेखा ढवळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

सुरेखा ढवळे यांना मिळालेले पुरस्कार 

- राज्य सरकारचा सन २०१५चा उत्कृष्ट दिव्यांग व्यक्ती पुरस्कार.

- वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचा  आदर्श महिला पुरस्कार. 

-  सावली दिव्यांग संघटनेचा दिव्यांग महिला पुरस्कार. 

- संताजी धनाजी कार्यकर्ता पुरस्कार‌. 

- शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलन पुरस्कार. 

- सासवड पोलीस स्टेशनचा आदर्श महिला पुरस्कार. 

- हत्ती गणपती मंडळाचा शारदा मानकर पुरस्कार.

-  जिजाऊ सावित्री महिला पुरस्कार. 

- साई मेमोरियल ट्रस्ट पुरस्कार.

- नवल फाउंडेशनचा पुरस्कार. 

- कोरोना योद्धा पुरस्कार. 

आतापर्यंतची सुरेखा ढवळे यांची उल्लेखनीय कामगिरी 

- पुरंदर तालुक्यातील आठ गावातील २९ भूमहिनांना प्रत्येकी अर्धा गुंठा सरकारी जागा मंजूर करण्यात  सिंहाचा वाटा. 

- पुरंदर तालुक्यातील शंभर दिव्यांगांना घरकुल मंजूर.

- दीडशे दिव्यांगांना पिवळ्या शिधापत्रिका मिळवून दिल्या. 

-  स्वतःचे मणी मंगळसूत्र मोडून दिव्यांगांच्या ऑपरेशनचा खर्च केला.

-  वनपुरी येथील विधवा एकल महिलेची जमीन लाटणाऱ्यांवर  गुन्हे दाखल करून जमीन पुन्हा परत मिळवून दिली.

- बारा दिव्यांग व्यक्तींचे विवाह लावून दिले.

- सरकारच्या विविध योजनांची माहिती, दिव्यांगांचे युडी आयकार्ड काढून देण्यासाठी तालुका स्तरावर शिबिरांचे आयोजन.