Ex Pune zp precident jalinder kamthe : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जालिंदर कामठे यांचे दुःखद निधन!
बुधवारी (दि.१ जुलै) रात्री राहत्या घरी झोपेतच घेतला अखेरचा श्वास, त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ७ वाजता होणार अंत्यसंस्कार : राष्ट्रवादी काँग्रेसने धडाडीचा नेता गमावला
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १ जुलै २०२६ :- कोंढवा बुद्रुक (ता.हवेली) येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जालिंदर कामठे यांचे बुधवारी (दि.१ जुलै) पहाटे झोपेतच निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.
पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती जयश्री कामठे या त्यांच्या पत्नी होत. दरम्यान, कामठे यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने एक धडाडीचा नेता गमावला आहे.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, एक बहीण आणि तीन भाऊ आणि नातवंडे असा परिवार आहे. जालिंदर कामठे यांच्या आई हौसाबाई कामठे यांचे तीन महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक हे जालिंदर कामठे यांचे मूळ गाव आहे.
दिवंगत जालिंदर कामठे यांचा राजकीय प्रवास हा १९८६ मध्ये काँग्रेस पक्षापासून सुरू झाला. ते माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दिवंगत रामकृष्ण मोरे यांचे खंदे समर्थक व सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असत.
पुणे जिल्हा परिषदेच्या सन १९९७ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ते कॉंग्रेसच्या तिकिटावर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. त्यानंतर दि.२१ मार्च १९९९ मध्ये कॉंग्रेसच्यावतीने ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर तीनच महिन्यात कॉंग्रेसचे विभाजन झाले. या विभाजनानंतर पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या सरकारी बंगल्यावरच दि. १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला.
दरम्यान, त्यांनी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठेच्यावतीने चार प्राथमिक व माध्यमिक शाळा, दोन कनिष्ठ महाविद्यालय आणि एक वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले. नुकतीच त्यांनी लॉ कॉलेजची परवानगी मिळवली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग सहा वर्षे ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी काही काळ पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) तज्ज्ञ संचालक म्हणूनही काम पाहिले.
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते काही काळ भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष होते. परंतू, भाजपमध्ये ते फार काळ रमू शकले नाहीत. सप्टेंबर २०२५ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांचा हा पक्षप्रवेश घरवापसी मानला जात आहे. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी विद्यार्थी संघटना आणि पुढे युवक काँग्रेसच्या चळवळीत काम केले. त्यांनी त्यांच्या कामातून धडाडीचे कार्यकर्ते म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात लौकिक निर्माण केला होता. त्यांच्या पुणे शहरातील विद्यार्थी चळवळी आणि तत्कालीन पुणे विद्यापीठावरील त्यांची अनेक आंदोलने गाजली.
जालिंदर कामठे यांनी त्यांचे मित्र स्वर्गीय रामभाऊ बराटे यांच्या नावाने आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी पुरस्कार सुरू केला होता. त्याचबरोबर समाजातील सामाजिक क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना ते विविध पुरस्कार देऊन गौरवित असत. पुणे शहरातील सुभद्रा हॉटेलवर त्यांनी सुभद्रा कट्टा सुरू केला आहे. हा कट्टा मागील सुमारे चार दशकांपासून अखंडपणे चालू आहे.
जालींदर कामठे यांनी भूषविलेली राजकीय पदे
१) सरपंच, कोंढवा बुद्रुक येवलेवाडी --- सन १९८९ ते १९९७.
२) अध्यक्ष एन.एस.यु. आय. (NSUI) --- सन १९८६ ते १९९२.
३) सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस --- सन १९९३ ते १९९५.
४) अध्यक्ष पुणे जिल्हा युवक काँग्रेस --- सन १९९५ ते १९९९.
५) अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद --- दि. २१ मार्च १९९९ ते २० मार्च २००२.
६) अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस --- सन २०१४ ते २०१८.
७) सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष --- सन २०१८ ते २०२०.
८) भाजप पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष.
९) सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस --- सन २०२५ पासून आजतागायत.
