Zp Teachers' Association Federation Meet : महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक 'टीईटी' रद्दच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना घालणार 'साकडे'!
'अण्णां'च्या राळेगणसिद्धीत येत्या गुरुवारी (दि. ११ जून) शिक्षक संघाच्या महामंडळ सभेचे आयोजन : पुणे जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय वाळुंज यांची माहिती
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ९ जून २०२६ :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा यंदा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी (ता. पारनेर) आयोजित करण्यात आली आहे. येत्या गुरुवारी (दि. ११ जून) सकाळी १० वाजता राळेगणसिद्धी येथील स्वर्ग लॉन्स येथे ही महामंडळ सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय वाळुंज यांनी दिली. या सभेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक टीईटी परिक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना 'साकडे' घालणार आहेत.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात आणि राज्य संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या नेतृत्वाखाली या महामंडळ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, राज्य आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. सध्या शिक्षकांमध्ये टीईटी,संच मान्यता, पदोन्नती, बीएलओ कामे, पदोन्नती, ऑनलाइन कामे,यासारख्या अनेक समस्यांनी प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दरम्यान, सरकारी शाळा टिकवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारी शाळांचा आवाज बनण्याची विनंती अण्णा हजारे यांना शिक्षकांनी केली होती. ही विनंती अण्णा हजारे यांनी मान्य केली आहे. यामुळे शिक्षक चळवळीला एक नवा आशावाद निर्माण झाला असल्याचे मत दत्तात्रय वाळुंज यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्या माध्यमातून सरकारमध्ये जागृती करण्यासाठी आणि शिक्षक आंदोलनाची नवी दिशा ठरविण्यासाठी तसेच कायदेशीर लढाई लढण्यासाठी या महामंडळ सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे नेते बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष आबासाहेब जगताप,राज्य संघाचे उपनेते रावसाहेब रोहकले,अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी सांगितले.
या महामंडळ सभेला राज्यभरातील शिक्षक उपस्थित राहणार आहेत. ही महामंडळ सभा अभूतपूर्व असेल असा, विश्वास राज्य अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी व्यक्त केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वातंत्र्योत्तर काळात सामान्य माणसाच्या हक्कांसाठी याच ऐतिहासिक राळेगणसिद्धी भूमीतून अनेक जनआंदोलने यशस्वी केली आहेत. त्यामुळे या महामंडळ सभेकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले असल्याचे दत्तात्रय वाळुंज यांनी सांगितले.
