Zp Employee Transfers Cancelled : जनगणनेमुळे यंदा जिल्हा परिषद कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षकांची बदल्यांमधून सुटका!
राज्य सरकारचा बदल्या रद्दचा निर्णय : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २० एप्रिल २०२६ :- महाराष्ट्रात सध्या चालू असलेल्या जनगणनेमुळे यंदा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कर्मचारी आणि शिक्षकांची बदल्यांमधून सुटका झाली आहे. राज्य सरकारने जनगणनेची कामे करत असलेल्या कर्मचारी व शिक्षकांच्या यंदा बदल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. देशभरात सध्या जनगणनेचे काम चालू आहे. या पार्श्वभूमीवर जनगणनेचे काम करत असलेल्या कर्मचारी व शिक्षकांच्या यंदा बदल्या करु नयेत, अशी सूचना केंद्रीय गृह सचिवांनी पत्राद्वारे राज्य सरकारला केली होती.
या सूचनेनुसार जनगणना अधिनियम, १९४८ आणि जनगणना नियम, १९९० अंतर्गत वैधानिक कर्तव्ये सुरळीतपणे पार पाडण्याकरीता जनगणनेच्या कामाशी संबंधित जिल्हा परिषदेतील गट-क व गट-क संवर्गातील (जिल्हा परिषदांमधील सर्व विश्वकांसह) कर्मचाऱ्यांची सन २०२६ ची सर्वसाधारण बदली प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे ग्रामविकास विभागाच्या उपसचिव वैशाली डिगे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना कळविले आहे.
