Book publication: कवी मिथुनचंद्र चौधरी यांच्या कवितेला बोलीभाषेची ओढ! 

ज्येष्ठ कवी हेमकिरण पत्की यांचे प्रतिपादन : ‘आतली कवाडं’ या कविता संग्रहाचे प्रकाशन

Book publication: कवी मिथुनचंद्र चौधरी यांच्या कवितेला बोलीभाषेची ओढ! 
पुणे:- कवी मिथुनचंद्र चौधरी यांच्या 'आतली कवाडं' या कविता संग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. रणधीर शिंदे व अन्य.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २५ फेब्रुवारी २०२६ :- कवी मिथुनचंद्र चौधरी यांच्या कवितेला बोलीभाषेची ओढ आहे. त्यामुळे त्यांच्या या कवितांमध्ये निसर्गाचा आणि माणसांविषयीचा ओलावा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी हेमकिरण पत्की यांनी येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. 

मराठवाडा मित्रमंडळ शिक्षण  संस्थेत मिथुनचंद्र चौधरी यांच्या ‘आतली कवाडं’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन समीक्षक प्रा. रणधीर शिंदे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ कवी हेमकिरण पत्की या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी पत्की बोलत होते. या कार्यक्रमाला प्रा. समर नखाते, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, निर्मात्या गार्गी कुलकर्णी, प्रा.संतोष शेणई, शब्दालय प्रकाशनाचे सुमीत लांडे, समीक्षक अक्षय शेलार, लक्ष्मी यादव, संपादक संजय आवटे, प्रदीप आवटे आदी नामवंत उपस्थित होते.

कवी मिथुनचंद्र चौधरी हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त लेखक-दिग्दर्शक असून, ते सध्या सिंबायोसिस विद्यापीठात फिल्म प्रोग्रॅमचे प्रमुख आणि साहाय्यक प्राध्यापक आहेत. हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे. आपले मनोगत लालित्यपूर्ण शैलीत व्यक्त करताना त्यांच्या कवितेची पाळंमुळं, त्यांची जडणघडणविषयी चौधरी यांनी सविस्तर भाष्य केले. 'अमानुषपणाला कसोशीने हरवण्याचा प्रयत्न करते ती कविता’, अशा शब्दांत त्यांनी कवितेची व्याख्या मांडली. तुकारामापासून ते कोलटकर व ढसाळ यांच्यापर्यंतचा कवींचा आणि मातीचा वारसा सांगत ते  म्हणाले, "आपल्यापूर्वीही कविता होती, आताही कविता आहे, आणि आपल्यानंतरही कविता पुरून उरेल."

चौधरी यांच्या अल्पाक्षरी कवितांबाबत दीर्घ चिंतनात्मक बोलताना हेमकिरण पत्की म्हणाले, "आपली आपली एक चौकट निर्माण होत असते, आणि ती चौकट मोडून काढण्याचं, कवितेचा रियाज करण्याचं काम कवितेच्या निमित्ताने घडते. हे काम मिथुनचंद्रच्या कवितेने केलं." यावेळी पत्की यांनी चौधरी यांच्या काही कविताही उद्धृत केल्या. ‘जो वेदना सहन करतो व त्याविषयी कसलीही तक्रार करत नाही, अशा प्रत्येक माणसाचं काळीज कवीचं असतं’. 'मिथुनच्या कवितांची प्रकृती हिरो वरशिपिंगची नाही. त्यामुळे ती समकालीन कवितांहून ठळकपणे वेगळी ठरते", अशा शब्दांत त्यांनी कवितांची उकल केली. 

समीक्षक रणधीर शिंदे यांनी चौधरी यांच्या कवितेने भवतालला, त्यातल्या दांभिकपणाला ज्या संवेदनशीलतेने कवेत घेतलं आहे, त्याविषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली. तसेच, कवितांमध्ये आधुनिक प्रतिमांची उकल करीत भारतीय तत्वज्ञानाशी असलेला संबंधही उलगडून दाखवला. ही कविता आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रारंभी शब्दालय प्रकाशनच्या मृण्मयी पाटील-लांडे यांनी प्रास्ताविक केले.डॉ. सुजाता शेणई यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला साहित्य, चित्रपट, तसेच सामजिक चळवळीतील अनेक दिग्गज उपस्थित होते. सहआयोजक म्हणून मराठवाडा मित्रमंडळ संस्थेतील मंडळींनी महत्वाची भूमिका पार पाडली.