Book publication : 'कुछ सरल,कुछ तरल' या काव्यसंग्रहात वाचकांच्या मनाचा ठाव घेण्याची ताकद!
डॉ. दत्ता कोहिनकर : लातूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर- उणकल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २२ फेब्रुवारी २०२६ :- मानवी भावभावनांना नेटक्या आणि संयत शब्दात व्यक्त करून वाचकांचा मनाचा ठाव घेण्याची ताकद शिल्पा करमरकर- उणकल यांच्या लेखनात आहे. 'कुछ सरल कुछ तरल' या काव्य विचार संग्रहाच्या माध्यमातून ती साहित्य रसिकांपुढे आली आहे. यापुढील काळातही त्यांच्याकडून सकस साहित्यनिर्मिती होईल,असे मत प्रसिद्ध वक्ते डॉ. दत्ता कोहिनकर यांनी येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
मराठवाड्यातील लातूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर- उणकल यांनी लिहिलेल्या आणि पुण्यातील ओशन वेव्हज प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या 'कुछ सरल कुछ तरल' या पहिल्या काव्य संग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य प्रेरणा युवा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते डॉ.उमाकांत मिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. कोहिनकर बोलत होते. यावेळी कवयित्री शिल्पा करमरकर आणि प्रकाशक पराग पोतदार व्यासपीठावर उपस्थित होते.निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी बन्सी गवळी, भारतीय प्रशासकीय सेवेतील डॉ. ज्योत्स्ना पडियार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ. कोहिनकर पुढे म्हणाले, " दुसऱ्याला आनंद वाटणे ही खूप अवघड गोष्ट आहे. शिल्पा करमरकर यांच्या लेखनातून हा आनंद साहित्य रसिकांना मिळतो.आपल्या जीवनातील विविध प्रवाहांना नेमक्या शब्दात त्यांनी मांडले आहे."
यावेळी बोलताना डॉ. मिटकर म्हणाले, "शिल्पा करमरकर या सामाजिक जाणीव जपणाऱ्या अधिकारी आहेत. तीच संवेदना त्यांच्या लेखनातून प्रकट झाली आहे. उच्च पदावर असूनही सामान्यांप्रती आपुलकी, जिव्हाळा आणि त्यातून आलेले हे लेखन आहे."
यावेळी प्रकाशक पराग पोतदार यांनी पुस्तकनिर्मितीमागील भूमिका विशद केली.कमी शब्दात योग्य आशय मांडणारे हे लेखन आहे.साहित्य रसिकांना हे पुस्तक नक्की आवडेल. प्रत्येकाला त्यांच्या जीवनातील विविध भावभावनांशी जोडण्याचे काम शिल्पा करमरकर- उणकल यांच्या लेखनातून झाल्याचे पोतदार यांनी यावेळी नमूद केले.
प्रारंभी कवयित्री शिल्पा करमरकर- उणकल यांनी आपल्या मनोगतात लेखनाची प्रेरणा विषद केली. आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे पाहून त्याची नोंद डोळसपणे टिपण्याचे काम केले आणि त्याला शब्दरूप दिले. सहजपणे स्वतःशी केलेला संवाद आणि त्यातून आलेले शब्द या काव्य विचार संग्रहात मांडले आहेत. त्यातील एक जरी विचार कोणाला आवडला तरी या लेखनाचा उद्देश सार्थक होईल, हीच भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लेखनाला चित्रकार स्वस्तिक जवळेकर यांनी अनुरूप चित्र काढून वेगळ्या उंचीवर नेल्याचे सांगितले.
नाशिक येथील जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाची माहिती दिली. अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र पवार यांनी लेखिकेचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय उणकल आणि प्रणव उणकल यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्य रसिक, शासन सेवेतील अधिकारी यांची आवर्जून उपस्थिती होते.
