Bicycles for Students in Naxal-Affected Areas : वाढदिवसानिमित्त जमा झालेल्या रक्कमेतून नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना २५ सायकली भेट!

पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा अनोखा उपक्रम : गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्याकडून अध्यक्ष रवी भोसले यांचे अभिनंदन व आभार 

Bicycles for Students in Naxal-Affected Areas : वाढदिवसानिमित्त जमा झालेल्या रक्कमेतून नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना २५ सायकली भेट!

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २६ मार्च २०२६ :- पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेल्या शिवदान पेटीत जमा झालेल्या रक्कमेतून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील २५ विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यात आल्या आहेत. या अनोख्या उपक्रमाची गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक निलोल्पल यांनी पत्राद्वारे रवींद्र भोसले यांचे या अनोख्या उपक्रमाबाबत अभिनंदन करत आभार मानले आहेत. 

कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसा- निमित्त हारतुरे, फुलांचे गुच्छ आणि भेटवस्तू न आणता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या इच्छेनुसार आर्थिक मदत करण्याचे आवाहन मित्रपरिवार, नातेवाईक आणि कॉन्ट्रॅक्टर्सना केले होते. या आवाहनानंतर वाढदिवसी ठेवण्यात आलेल्या शिवदान पेटीत जमा झालेल्या रक्कमेतून या २५ सायकली विकत घेण्यात आल्या आणि गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी भेट म्हणून पाठविण्यात आल्या आहेत. या सायकली पुण्यातील आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून गडचिरोलीला पाठविण्यात आल्या. 
 
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम माओवादग्रस्त भागात लोकशाही व शांततेच्या मार्गाने विकास साधावा, यासाठी गडचिरोली पोलिसांनी 'प्रोजेक्ट उडान' हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांद्वारे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊन जिल्ह्यात साक्षरात वाढून माओवादी चळवळीला आळा बसावा,हा या  नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या अंमलबजावणीमागचा उद्देश आहे.

याच पार्श्वभूमीवर आपली सामाजिक संस्था आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्यावतीने अतिदुर्गम अशा माओवादग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात २५ सायकली मोफत उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे या सायकलीमुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्या-येण्याचा त्रास कमी होऊन त्यांना शाळेबद्दल आवड निर्माण होण्यास मदत होईल. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे या भागातील साक्षरतेत वाढ होण्यास निश्चितच मदत होईल, असे पोलिस अधिक्षक निलोल्पल यांनी रवींद्र भोसले यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

आपण दिलेल्या या योगदानामुळे दुर्गम भागातील शालेय शिक्षणाचा विकास होण्यास तसेच शांततामय वातावरण निर्माण होऊन पोलिस दलास माओवादीस आळा घालण्यास निश्चितच मदत होत आहे. पोलीस प्रशासनास आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक अभिनंदन करतो, अशा शब्दांत निलोत्पाद यांनी भोसले यांचे अभिनंदन केले आहे. 

दरम्यान, पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून केवळ ठेकेदारीचेच काम केले जात विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येत आहेत. यानुसार गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करणे, वह्या-पुस्तके व स्कूल बॅग्ज उपलब्ध करून देणे व आर्थिकदृष्ट्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरणे आदी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.