Education Bill Lecture : बदलत्या आंतरराष्ट्रीय संदर्भात भारताला सक्षम,आत्मनिर्भर आणि मूल्याधिष्ठित शिक्षण व्यवस्थेची गरज! 

प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस यांचे प्रतिपादन : आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्यावतीने विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयकावर व्याख्यान

Education Bill Lecture : बदलत्या आंतरराष्ट्रीय संदर्भात भारताला सक्षम,आत्मनिर्भर आणि मूल्याधिष्ठित शिक्षण व्यवस्थेची गरज! 
पुणे:- आबासाहेब गरवारे महाविद्यालयात विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानप्रसंगी प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे व अन्य.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २५ एप्रिल २०२६ :- भारतीयत्व जपत जागतिक स्तरावर भारताची स्वतंत्र व प्रभावी ओळख निर्माण करणे गरजेचे आहे. बदलत्या आंतरराष्ट्रीय संदर्भात भारताला सक्षम,आत्मनिर्भर आणि मूल्याधिष्ठित शिक्षण व्यवस्थेची नितांत गरज आहे. यासाठी विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक उपयुक्त ठरणार आहे. अशा प्रकारची विधेयके ही त्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे प्रतिपादन  प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी येथे बोलताना केले. विकसित भारताच्या निर्मितीत शिक्षक हा सर्वात मोठा परिवर्तनकारी घटक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

एम.ई.एस.आबासाहेब गरवारे महाविद्यालय (स्वायत्त) तथा भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय शिक्षण मंडळ स्थापना दिनानिमित्त 'विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक २०२५' या विषयावर खास व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानप्रसंगी प्रा. चिटणीस बोलत होते. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत मंत्री डॉ. गणेश चव्हाण,आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विलास उगले, उपप्राचार्य प्रा. अनिल खैरनार आदी उपस्थित होते. 

प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस पुढे म्हणाले, "कोणतेही विधेयक हे राजपत्राच्या स्वरूपात लागू होण्याच्या प्रक्रियेत असताना केवळ शिक्षकांनीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक नागरिकाने त्या विधेयकाचा अभ्यास करून त्यावर रचनात्मक आणि सकारात्मक सूचना देणे आवश्यक असते."

भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्यामार्फत स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम काळाची गरज आहे. भारतीय शिक्षण मंडळामार्फत अशा प्रकारचे चिंतनपर आणि राष्ट्रहिताचे कार्यक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

प्राचार्य प्रा. विलास उगले यांनी विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयकाचे विविध पैलू स्पष्ट करत त्याची आवश्यकता आणि महत्त्व अधोरेखित केले. उपप्राचार्य प्रा. अनिल खैरनार यांनी सूत्रसंचलन करताना भारतीय शिक्षण मंडळाच्या कार्याचा, उद्दिष्टांचा आणि राष्ट्रनिर्माणातील भूमिकेचा संक्षिप्त आढावा सादर केला.