Pune zp teacher book :पुणे झेडपीच्या गुरूजींनी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचा आता जर्मन भाषेत अनुवाद! 

राज्य शिक्षक पुरस्काराचे मानकरी नंदकुमार येवले यांचे इंग्रजी भाषेनंतर आता जर्मन भाषेतील अनुवादित पुस्तक प्रकाशित

Pune zp teacher book :पुणे झेडपीच्या गुरूजींनी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचा आता जर्मन भाषेत अनुवाद! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २५ एप्रिल २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने याआधी इंग्रजी भाषेतून लिहिलेल्या पुस्तकाचा आता जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. नंदकुमार येवले असे या शिक्षकाचे नाव असून, ते राज्य शिक्षक पुरस्काराचे मानकरी आहेत. याआधी नंदकुमार येवले यांनी शिर्डी येथील साई बाबांच्या विचारांवर आधारित'साईबाबा'ज इनव्हॅल्यूएबल मेसेज (Saibaba's invaluable message) हे इंग्रजी भाषेतील पुस्तक लिहिले होते. हेच पुस्तक आता जर्मन भाषेत अनुवादित केले आहे. या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन शिर्डी देवस्थान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

साईबाबांनी जगाला शांततेचा संदेश दिला व विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. त्यामुळे जगात शांतता नांदावी असे वाटत असेल तर, साईबाबांच्या विचारांची जगाला नितांत गरज आहे. मानवी जीवनाच्या विकासासाठी प्रत्येक माणसाने साईबाबांच्या विचारांची कास धरली पाहिजे, असे प्रतिपादन  गोरक्ष गाडीलकर यांनी केले. शिक्षक नंदकुमार येवले यांच्या sai Baba's invaluable message या इंग्रजी भाषेतील जर्मन अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. यावेळी लेखक नंदकुमार येवले, नेदरलँड येथून खास या पुस्तक प्रकाशन समारंभासाठी भारतात आलेले डॉ. एटीयेन प्रेमदानी बिना प्रेमदानी, बाल सुब्रमण्यम, 
शोभा सुब्रमण्यम अशोक गाडीलकर, नागेश केदारी,  गणेश कडूसकर, दादासाहेब सगळे काशिनाथ घोंगडे कार्तिक येवले आणि आनंद संत उपस्थित होते.

जगभरात शांतता विश्वबंधुत्व व एकता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने साईबाबांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने नंदकुमार येवले यांनी जगातील शंभर पेक्षा अधिक ग्रंथालय आणि ५०० पेक्षा अधिक नामवंत व्यक्तींना sai Baba's invaluable message हे पुस्तक स्वखर्चाने मोफत पाठवले आहे.  साईबाबांचे विचार सर्वत्र सर्व दूर पोहोचावे भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी व भारतीय संतांचे विचार दर्शन जगाला घडावे, हा यामागील उद्देश असल्याचे येवले यांनी सांगितले. 

जर्मन भाषेतील पुस्तकाचा अनुवाद पाया बिफानो यांनी  केला असून जर्मनीतील विविध साई मंदिर व अनेक जर्मन साई भक्तांपर्यंत हे पुस्तक पोहोचविण्याचे काम मुळचे चेन्नई येथील रहिवासी आणि सध्या जर्मनीत कार्यरत असलेले राम आया हे संगणक अभियंता करत आहेत.

दरम्यान, डच भाषेतील पुस्तकाचा अनुवाद डॉ. एटियेन प्रेमदानी यांनी करून घेतला  आहे. सध्या ते हे पुस्तक अनेक साई भक्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत असून ते नेदरलँड येथील रहिवासी असले तरी ते मूळचे  भारतीय वंशाचे डॉक्टर आहेत. सध्या युरोप खंडातील विविध भाषांमध्ये हे पुस्तक भाषांतरित होत आहे.  इटालियन भाषेतील पुस्तक लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर आहे. प्राथमिक शिक्षक नंदकुमार येवले यांनी केलेले हे कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार शिर्डी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी यावेळी बोलताना काढले. 

यावेळी बोलताना भारतीय वंशाचे डॉक्टर एटीयेन प्रेमदानी म्हणाले, " भारतीय संस्कृती जगात महान असून या संस्कृतीची व विचारांची ओळख जगाला व्हावी, हा उद्देश हाती घेऊन एक प्राथमिक शिक्षक किती चांगले कार्य करू शकतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे गुरूजी आहेत. या कार्यक्रमाचे संयोजक अशोक गाडीलकर, आनंद संत, नागेश केदारी,गणेश कडूसकर, दादासाहेब सगळे, काशिनाथ घोंगडे, कार्तिक येवले यांनी केले नंदकुमार येवले यांनी आभार मानले.