जागतिक महिला दिन विशेष लेख :- पिंपळवाडी जिल्हा परिषद शाळा ते अतिरिक्त जिल्हाधिकारी व्हाया तलाठी!
पुणे जिल्ह्यातील झेडपी शाळेच्या विद्यार्थीनी ज्योती पाटील-नाईकडे यांचा अनोखा प्रवास
पुणे जिल्ह्यातील पिंपळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थीनी असलेल्या ज्योती पाटील-नाईकडे या अगदी शालेय जीवनापासून ग्रामीण भागातील परिस्थितीशी झगडत झगडत अतिरिक्त जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचल्या आहेत. सध्या त्या मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा हा अतिरिक्त जिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास हा जिल्हा परिषद शाळा ते अतिरिक्त जिल्हाधिकारी व्हाया तलाठी असा झाला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या या अनोख्या प्रवासाविषयी टाकलेला हा प्रकाशझोत.
- दत्तात्रय जानकु वाळुंज,
माजी सदस्य, शिक्षण समिती, जिल्हा परिषद, पुणे.
पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या धाराशिवच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती नाईकडे या मुळच्या ज्योती पाटील.आई-वडील दोघेही जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक. त्यामुळे ज्योती पाटील यांचे बालपण ग्रामीण भागातच गेले आणि शालेय शिक्षणही ग्रामीण भागातच पूर्ण करावे लागले. आईवडील दोघेही शिक्षक असल्याने घरात शैक्षणिक वातावरण होते. या शैक्षणिक वातावरणामुळे त्यांनी इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
प्राथमिक शिक्षण घेत असतानाच वक्तृत्व, निबंध, नाट्यछटा आदी क्षेत्रात शालेय स्तरावर विशेष प्राविण्य मिळविले. प्राथमिक शिक्षण जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केल्यानंतर आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे शहर गाठले. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून सुक्ष्म जीवशास्त्रात (मायक्रोबायोलॉजी) पदवी प्राप्त केली.
माध्यमिक शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यादृष्टीने अभ्यासाची तयारी केली. विशेष म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतानाच त्यांनी शॅम्पेन कंपनीत मायक्रोबायोलॉजीस्टची नोकरी पत्करली आणि ही नोकरी करत असतानाच स्पर्धा परीक्षेद्वारे त्यांची तलाठी पदावर निवड झाली. या निवडीनंतर मायक्रोबायोलॉजिस्टची नोकरी सोडून त्या तलाठी पदावर रूजू झाल्या. या काळात त्यांनी सोलापूर व पुणे जिल्ह्यात लोकाभिमुख कामांना प्राधान्य दिले.
शेतीविषयक कामे, वारस नोंद, यासारख्या विविध कामात महिलाना अडचणी यायच्या. मात्र महिला तलाठी आहे म्हणून, अनेक महिला धाडसाने कार्यालयात यायच्या आणि त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक महिलेला त्या न्याय मिळवून द्यायचा. तलाठी पदावर कार्यरत असतानाही त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरूच ठेवला होता. त्यामुळे तलाठी पदावर कार्यरत असतानाच त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अधीक्षक वर्ग २ या पदावर निवड झाली.
त्यानंतर त्यांनी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात चार वर्षे काम केले. शाळा भेटी,आढावा बैठका, बचत गटांच्या महिलांशी सवांद साधून केंद्र सरकारच्या मध्यान्ह भोजन योजनेचे काम उत्कृष्ठपणे केले. शिवाय महिला बचत गट सक्षम बनविले. ही नोकरी करता करताही त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास अखंडपणे सुरूच ठेवला आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या शेवटच्या प्रयत्नात त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आणि त्यांचे वर्ग १ चा अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
राज्याच्या महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी सातारा, सोलापूर व सांगली येथे उपजिल्हाधिकारी,प्रांताधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आदी विविध पदांवर काम केले. या पदांवर कार्यरत असताना त्यांनी सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविल्या, लोकांचे प्रश्न समजून घेतले आणि तक्रारींचे निराकरण करून न्याय देण्याची भूमिका यासाठी कायम आग्रही राहिल्या.आईवडील शिक्षक असल्याने घरात शैक्षणिक वातावरण, माहेर व सासरच्या लोकांचे पाठबळ यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये विविध प्रकारच्या तीन पदावर निवड व काम करण्याची संधी मिळाली.
सध्या त्या मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्याच्या (पुर्वाश्रमीचे उस्मानाबाद) अतिरिक्त जिल्हाधिकारी (अप्पर जिल्हाधिकारी) या पदावर कार्यरत आहेत. तेथेही त्या आईवडिलांचा शैक्षणिक वारसा आणि पुर्वीपासून असलेलं समाजसेवेची आवड जोपासत लोकाभिमुख प्रशासनावर भर देत आहेत.
लग्नापुर्वीच्या ज्योती पाटील या लग्नानंतर ज्योती नाईकडे झाल्या. पती संजय नाईकडे हेसुद्धा वर्ग १ चे अधिकारी आहेत. पती नाईकडे हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आहेत. नोकरी करत असतानाच चांगले प्रशासन ठेवण्याबरोबरच त्या सामाजिक भान ठेऊन समाजहिताचे कामही विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करत आहेत. हे सगळे काम करत असतानाच त्या ट्रेकिंग, बुद्धिबळ, वाचन, सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असतात. शिवाय त्या नातेवाईक व मित्र परिवारालाही वेळ देतात.
सध्या त्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रलंबित निवाडे प्राधान्याने सोडवत असतात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांशी संवाद साधण्यावर अधिक भर देतआहेत. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.