Scholarship Exam Result : इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा 'डंका'!
इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत धानोरे झेडपी शाळेची मजुराची मुलगी आर्या पारेकर राज्यात प्रथम, तर टाकळकरवाडी शाळेचा श्रेयस साळुंके राज्यात दुसरा
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ४ जुलै २०२६ :- इयत्ता पाचवी आणि आठवीच्या सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा डंका वाजला आहे. राज्य गुणवत्ता यादीत पुणे झेडपीच्या शाळांनी मोठी बाजी मारली आहे. राजगुरुनगर (खेड) तालुक्यातील धानोरे जिल्हा परिषद शाळेतील मजुराची मुलगी आर्या पारेकर हिने इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम तर, टाकळकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील श्रेयस साळुंके याने इयत्ता पाचवीच्या परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE) वतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल दि. २ जुलै २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २९ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले असून यापैकी तीन विद्यार्थी राज्यातील पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये आहेत.
इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २२ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले असून यापैकी ५ विद्यार्थ्यांनी राज्यातील गुणानुक्रमे पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले आहे. दरम्यान, राजगुरुनगर तालुक्यातील धानोरे येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवी व आठवीचे मिळून एकूण ६६ विद्यार्थी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत तर, टाकळकरवाडी शाळेचे एकूण २२ विद्यार्थी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद शाळांमध्ये 'मॉडेल स्कूल प्रकल्पा’ची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. झेडपी शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, हा या मॉडेल स्कूल प्रकल्प अंमलबजावणीचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश झाला आहे. शिवाय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक संख्येचे रेकॉर्ड करत पुणे जिल्ह्याने राज्यात निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. इयत्ता पाचवीच्या (ग्रामीण) शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३२ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असून हे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्य गुणवत्ता यादीतील एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३० टक्के विद्यार्थी हे पुणे जिल्ह्यातील आहेत. विशेष म्हणजे या ३२ विद्यार्थ्यांपैकी २९ विद्यार्थी पुणे जिल्हा परिषद शाळांतील आहेत.
इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५७ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. राज्य गुणवत्ता यादीतील एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे ४५ टक्के विद्यार्थी हे पुणे जिल्ह्यातील आहेत. या ५७ विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थी पुणे जिल्हा परिषद शाळांतील आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी ‘पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पा’अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे फलित आहे. यामध्ये गुणवत्ताधारित अध्यापन, शिष्यवृत्ती परीक्षेची नियोजनबद्ध तयारी, विद्यार्थी व शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, शैक्षणिक प्रगतीचे नियमित परीक्षण, सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन या उपक्रमांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सातत्याने मिळविलेले यश हे संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे. योग्य मार्गदर्शन, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थी राज्यात सर्वोच्च यश संपादन करू शकतात, हे या निकालाने सिद्ध केले आहे. भविष्यातही प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे-पाटील यांनी सांगितले.
हे सातत्यापूर्ण यश विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी व संपूर्ण शिक्षण विभागाच्या सामुदायिक प्रयत्नांचे फलित आहे. ‘पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पा’मुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण, संकल्पनाधारित अध्ययन आणि शैक्षणिक उत्कृष्टतेवर भर देत जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सकारात्मक परिवर्तन झाले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील हे उज्ज्वल यश म्हणजे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वोत्तम दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे प्रतिक असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी व्यक्त केले आहे.
