Chaskaman Canal Drinking Water : चासकमान कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी नियमित व शाश्वत पाणीपुरवठा सुरू व्हावा!

शिरूर तालुक्यातील भाजपच्या जिल्हा परिषद स्वाती पाचूंदकर यांची झेडपीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मागणी

Chaskaman Canal Drinking Water : चासकमान कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी नियमित व शाश्वत पाणीपुरवठा सुरू व्हावा!
पुणे:- भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचूंदकर.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ :- शिरूर तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे पाण्याचे स्त्रोत हे चासकमान कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र या कालव्यातून पुरेसा पाणीपुरवठा केला जात नसल्याने हे स्त्रोत निकामी होऊन, या भागातील गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ येत आहे. हे टाळण्यासाठी चासकमान कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांसाठी या कालव्यातून नियमित व शाश्वत पाणीपुरवठा सुरु करावा आणि याबाबत जलसंपदा विभागाला आदेश देण्यात यावा, अशी मागणी शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचूंदकर यांनी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत बोलताना केली. 

पुणे जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.१६ एप्रिल) पार पडली. या सभेत ऐन वेळेच्या विषयावर बोलताना स्वाती पाचूंदकर यांनी ही मागणी केली. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून, यावर कायमस्वरूपी मार्ग काढला जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी यावेळी दिले. 

यावेळी बोलताना स्वाती पाचूंदकर म्हणाल्या, "चासकमानच्या पाण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना एक महत्वाचा विषय लक्षात आला आहे. शिरूर तालुक्यातील गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. यानुसार चासकमानच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या बहुतेक पाणी पुरवठा योजनांचे स्रोत हे कालव्याच्या परिसरात घेण्यात येणाऱ्या विहिरीचे आहेत. मात्र या विहिरींना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होताना दिसत नाही. कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे जलसंपदा विभागाकडून केवळ मोघम स्वरुपात ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांना प्रत्यक्षात पाणीच मिळत नाही. परिणामी जलसंपदाचे अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि ज्यांना पाण्याची गरज असते,  असे शेतकरी यांच्यामध्ये पाणी नियमित आणि पुरेसे न मिळाल्यामुळे वारंवार वाद होत आहेत." 

जलसंपदा व जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यामधील वाद टाळण्यासाठी नवीन व जुन्या पाणी योजनांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अर्ज  आणि त्याला जलसंपदा विभागाची मंजुरी या दोन गोष्टी बंधनकारक करणे गरजेचे आहे, असेही स्वाती पाचूंदकर यांनी यावेळी सांगितले. 

झेडपीच्या सभेत स्वाती  पाचूंदकर यांनी केलेल्या अन्य मागण्या

-  नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात यावी.

- जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावीत. 

- मॉडेल स्कूल करत असताना प्रयोग शाळा, संगणक प्रयोगशाळांसाठ आवश्यक असलेले प्रशिक्षक प्रशिक्षित असावेत. 

- पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या आहे. त्यामुळे महिलांसाठी असणारा सध्याचा महिला कक्ष खूप छोटा असल्याने, नवीन स्वतंत्र मोठा कक्ष निर्माण करण्यात यावा. 

- जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजनांना सौरऊर्जा प्रणाली नाही,  अशा पाणीपुरवठा योजनांच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी विशेष तरतूद करण्यात यावी.