Village Panchayat administrater : ... आता राज्यातील ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी सरपंचांची नियुक्ती!
राज्य सरकारचा निर्णय : उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २२ फेब्रुवारी २०२६ :- महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या किंवा संपत असलेल्या ग्रामपंचायतीवर आता सरपंच हेच प्रशासक असणार आहेत. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे आता ग्रामपंचायतींचे प्रशासक हे अधिकारी नव्हे तर, त्या ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच हेच असणार आहेत. याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यामुळे राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींवर सरपंच हेच प्रशासक असणार आहेत. या सरपंच प्रशासकांना सहा महिने प्रशासक म्हणून काम करता येणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सुमारे ७५० ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
दरम्यान, मावळते उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांची मिळून एक प्रशासकीय समिती स्थापन केली जाणार आहे. यामुळे ग्रामपंचायतींची मुदत संपली तरीही आणखी किमान सहा महिने कालावधीसाठी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना काम करता येणार आहे. केवळ त्यांचे पदनाम बदलले जाणार आहे.
आतापर्यंत राज्यातील काही ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे व काही ग्रामपंचायतींची मुदत ही येत्या २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या (१९५९ चा ३) कलम १५१ च्या उप-कलम (१) च्या खंड (अ) मधील दुसऱ्या परंतुकानुसार, प्रशासकीय अडचणींमुळे ग्रामपंचायत निवडणुका घेणे शक्य नसल्यास, शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एखाद्या योग्य व्यक्तीची पंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून मावळत्या सरपंचांची नियुक्ती करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
