Dr. B.R. Ambedkar Birth Anniversary : 'आपण खातो त्या भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी'!

माजी न्यायाधीश सचिन जोरे यांचे प्रतिपादन: नांदेड सिटीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यात विचारांचा जागर

Dr. B.R. Ambedkar Birth Anniversary : 'आपण खातो त्या भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी'!

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १९ एप्रिल २०२६ :-  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ अन्यायाविरुद्ध लढा दिला नाही, तर शिक्षणाच्या बळावर स्वतःचे आणि संपूर्ण समाजाचे नशीब बदलले. आज आपण जे सन्मानाचे आयुष्य जगत आहोत, त्यातील प्रत्येक भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी आहे, याची जाणीव ठेवून तरुणांनी त्यांच्या विचारांच्या दिशेने झेप घेतली पाहिजे,” असे प्रतिपादन  माजी न्यायाधीश सचिन जोरे यांनी येथे बोलताना केले. 

पुणे शहरातील नांदेड सिटी येथील बहुजन हिताय संघातर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आजची युवा पिढी या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.

जोरे  म्हणाले, " माणसाची खरी श्रीमंती त्याच्या बँक बॅलन्सवरून नाही, तर त्याच्या प्रगल्भ विचारांवरून ठरते. केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता समाजासाठी योगदान देणे ही काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील लोकशाही टिकवण्यासाठी केवळ वाचन पुरेसे नाही, तर सजग नागरिक म्हणून मतदान करणे आणि निरंतर प्रबोधन करणे आवश्यक आहे.

तीन दिवसांचा सांस्कृतिक सोहळा

बहुजन हिताय संघाने आयोजित केलेल्या या जयंची महोत्सवात समाजाला जोडणारे विविध उपक्रमही राबवण्यात आले. यामध्ये 
रक्तदान शिबीर, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक प्रबोधन आदींचा समावेश होता. या सांस्कृतिक प्रबोधनात महामानवांच्या विचारांवर आधारित गीते घेण्यात आली. या सर्व कार्यक्रमांनी नांदेड सिटीचा परिसर दुमदुमून गेला होता.

मुख्य आकर्षण : महात्मा फुले व सावित्रीबाईंचे दर्शन

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे समतेचा संदेश देणारी भव्य रॅली. या रॅलीमध्ये रघूनाथ ढोक यांनी महात्मा फुले आणि राखी रासकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली होती. रॅलीचे स्वागत जनरंजनी सोसायटीच्यावतीने सचिन खानापूरे, भाऊसाहेब पाटील, विजय चव्हाण, युवराज सावंत व अन्य मान्यवरांनी केले. बहुजन हिताय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते.