Dr. Babasaheb Ambedkar Social Equality Week celebration : महाराष्ट्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करणार!

राज्य सरकारची घोषणा : येत्या दि.०८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन 

Dr. Babasaheb Ambedkar Social Equality Week celebration : महाराष्ट्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करणार!
पुणे:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. गजेंद्र बडे: ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १ एप्रिल २०२६ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा केला जाणार आहे. यानुसार राज्यात येत्या दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६  या कालावधीत या सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. 

या निर्णयानुसार राज्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या कार्यालयांनी या सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा आदेश राज्य सरकारने सर्व कार्यालयांना दिला आहे. यात भारतीय संविधानाची उद्देशिका किंवा प्रास्ताविकेची प्रत प्रत्येक कुटुंबास वितरीत करणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन करणे, सामाजिक समता कार्यक्रमनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती नागरिकांना देणे,आपापल्या विभागातील सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर व सन २०२६ हे वर्ष महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याने, त्यानिमित्ताने चवदार तळे, महाड येथील सत्याग्रहासंबंधी व त्यानुषंगाने मानवी हक्कांचे महत्त्व सांगणारे व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. 

हे सर्व कार्यक्रम जिल्हा व विभागीय स्तरावर आयोजित करणे, या कार्यक्रमात विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना वाटप करणे, 
सर्व विभागांमध्ये समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका या द्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करणे, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्ह्यात मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा आयोजित करणे, मार्जिन मनी योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करणे, 
भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती देणे, यामध्ये प्रामुख्याने संविधानाची निर्मिती, संविधान निमिर्ती समिती, अनुच्छेद, विशेषतः मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित करणे, समाज कल्याण या कार्यालयात महिला मेळावा आयोजित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणारे व्याख्यान आयोजित करणे, प्रत्येक जिल्ह्यात जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व नागरिकांचा मेळावा घेणे,  जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने जिल्हयातील सर्व महत्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविणे, सर्व जिल्हा जात पडताळणी कार्यालयात ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. 

याशिवाय सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालये, महाविद्यालये, निवासी शाळा, आश्रमशाळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणे, व्याख्यान, चर्चासत्रे आयोजित करणे आणि या कार्यक्रमांना संबंधित लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे, जिल्हास्तरावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान मेळावा आयोजित करणे, या मेळाव्यामध्ये बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगणारे व्याख्यान आयोजित करणे,  महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणून दि.२० मार्च, २०२६ पासून साजरे करण्यात येत असून त्यानिमित्ताने चवदार तळे, महाड येथील सत्याग्रहासंबंधी व त्यानुषंगाने मानवी हक्कांचे महत्व प्रतिपादन करणारे व्याख्याने आयोजित करावेत, असे राज्य सरकारने याबाबत प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले आहे.