Defamation Case : कथित सामाजिक कार्यकर्ते कल्पेश यादव यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल!
पुणे येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे सुनावणी होणार : पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालयाची बदनामी केल्याचा आरोप
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २४ नोव्हेंबर २०२६ :- पुणे जिल्ह्यातील कथित सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवाशाखेचे सचिव कल्पेश यादव यांच्याविरोधात पुणे येथील न्यायालयात बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालयाची सामाजिक माध्यमांवरून जाणीवपूर्वक बदनामीची मोहीम चालविल्याप्रकरणी पुणे येथील स्थानिक न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर यांनी ही बदनामीची याचिका दाखल केली आहे. यादव यांनी वाईट उद्देशाने जाणीवपूर्वक संस्थेची बदनामी करण्याच्या उद्देशाने समाज माध्यमांमध्ये जाणीवपूर्वक चुकीचे आरोप केल्याचे या बदनामी खटल्यात नमूद करण्यात आले आहे. या बदनामीमुळै महाविद्यालयाची नाहक नाचक्की झाल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. जाणीवपूर्वक ही बदनामी केल्याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३च्या कलम २२२ आणि २२३ आणि भारतीय न्याय संहिता२०२३च्या कलम ३५६ अंतर्गत बदनामीचा हा फौजदारी खटला दाखल करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे. स्वदेशियांना परवडणारे राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने १६६ वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. सध्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे राज्यभरात ७५ पेक्षा अधिक शाळा आणि महाविद्यालये कार्यरत आहेत. या संस्थेच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुमारे ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण ते 'पीएचडी'पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आपला शैक्षणिक शैक्षणिक वारसा जपत असतानाच अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यासाठी मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, राज्याचा तंत्रशिक्षण विभाग आणि अन्य महत्त्वाच्या नियामक संस्थांकडून सर्व प्रकारच्या शासकीय आणि शैक्षणिक मान्यता या महाविद्यालयास प्राप्त झाल्या आहेत. महाविद्यालय मान्यतेसाठी दिलेल्या प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे हे महाविद्यालय कर्वे रस्त्यावरील दिलेल्या पत्त्यावर सुरू आहे. मात्र, कल्पेश यादव यांनी या वस्तुस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर, मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालय अस्तित्वात नसल्याचा खोटा प्रचार केला. त्यानंतर दुष्ट हेतू मनात ठेवून या महाविद्यालयाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी केली. महाविद्यालयात आवश्यक सुविधा नसल्याचा खोटा दावा त्यांनी केला. त्यानंतर ‘यूट्यूब’ या समाज माध्यमावर खोट्या आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ व्हायरल केले. तसेच, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाकडे हे महाविद्यालय बेकायदा सुरू असल्याची तक्रार केली. आरोपी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा हेच खोटे आरोप केल्याचेही या बदनामी खटल्यात नमूद करण्यात आले आहे.
