Finally Fake disabled teacher suspended : ... अखेर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांना पुणे जिल्हा परिषदेचा दणका, पाच जण निलंबित!
पुणे जिल्ह्यातील अन्य ४१ शिक्षकांना नियुक्तीसाठी दाखवणार 'कात्रजचा घाट' : आतापर्यंत घेतलेले लाभ बंद आणि घेतलेल्या लाभाची वसुलीही करणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २५ नोव्हेंबर २०२६ :- ... अखेर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन नोकरीत दिव्यांगत्वाचे लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मोठा दणका दिला आहे. यानुसार पाटील यांनी बुधवारी (दि.२५ नोव्हेंबर) ५ शिक्षकांना तडकाफडकी जिल्हा परिषदेच्या सेवेतून निलंबित केले आहे. याशिवाय बोगस दिव्यांगत्वाचा लाभ घेतलेल्या अन्य ४१ शिक्षकांची जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शाळांवर नियुक्ती करुन, त्यांना 'कात्रजचा घाट' दाखविण्यात येणार आहे. दरम्यान, या सर्व शिक्षकांचे दिव्यांगत्वाचे लाभ बंद करण्यात आले असून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची वसुलीही केली जाणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गजानन पाटील यांनी याबाबतची माहिती बुधवारी (दि.२५ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलताना दिली. जिल्हा परिषदेच्यावतीने पुणे जिल्ह्यातील सुमारे ४५० शिक्षकांच्या दिव्यांगत्वाची औंध येथील जिल्हा रुग्णालय आणि ससून रुग्णालयात करण्यात आली. या फेरतपासणीत पाच शिक्षकांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण हे प्रत्येकी १० टक्क्यांंच्या आत तर, अन्य ४१ जणांचे दिव्यांगत्व हे ४० टक्क्यांंच्या आत असल्याचे आढळून आले आहे. यापैकी पाच टक्क्यांच्या आत दिव्यांगत्व आढळून आलेल्या पाच शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून उर्वरित ४१ जणांचे लाभ बंद करण्यात आले आहेत. शिवाय त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या लाभाची वसुलीही केली जाणार असून त्या सर्वांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये नियुक्त्या दिल्या जाणार असल्याचे गजानन पाटील यांनी यावेळी सांगितले.
पाटील पुढे म्हणाले, " मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० टक्क्यांंच्या आत दिव्यांगत्व आढळून आलेल्या पाच शिक्षकांची विभागीय चौकशी करण्यात आली. या चौकशीत प्रथमदर्शनी दोषी आढळून आल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ४०९ शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. परंतू, अनेक शिक्षकांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असून, या सर्व प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याची मागणी विविध दिव्यांग संघटनांनी केली होती. या मागणीनुसार या दिव्यांग प्रमाणपत्रांची ससून रुग्णालय आणि औंध येथील जिल्हा रुग्णालयात फेरतपासणी करण्यात आली होती."
दरम्यान, आणखी सुमारे ३५० जिल्हा परिषद शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची वैद्यकीय पडताळणी सुरू असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचेही गजानन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
निलंबित करण्यात आलेले शिक्षक (कंसात सध्या कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे नाव)
१) कोमल जालिंदर शिरसाट ( तांदळी, ता. शिरूर).
२) अरुणा विजयकुमार तांबे (मुटकेवाडी, ता. खेड).
३) मधुकर महादेव ठोंगिरे (दस्तूरवाडी, ता. आंबेगाव).
४) सुभाष संपतराव इंदोरे (शिंगवे, ता. आंबेगाव).
५) वाजीदा बादशहा शेख (वडकीनाला, ता. हवेली).
दिव्यांग कर्मचाऱ्यांच्याही दिव्यांगत्वाची फेरतपासणी करणार!
दरम्यान, सध्या केवळ शिक्षकांच्या दिव्यांगत्वाची फेरतपासणी करण्यात आली आहे. मात्र आता जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या विविध विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्याही दिव्यांगत्वाची फेरतपासणी करण्यात येणार असल्याचे गजानन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
