Urban Local Bodies Conference : राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणास मार्गदर्शक दिशा विषयावर राज्यस्तरीय परिषद!
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने आयोजन: येत्या २९ एप्रिलला होणार ‘विकसित महाराष्ट्र@२०४७ परिषद
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २६ एप्रिल २०२६ :- महाराष्ट्रातील शहरी विकासाला नवी दिशा देण्यासाठी पुणे येथे येत्या २९ एप्रिलला ‘विकसित महाराष्ट्र@२०४७ : शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी मार्गदर्शक दिशा’ या विषयावर एक राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. पुण्यातील
ही परिषद अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीत (YASHADA) दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता ही परिषद सुरू होणार आहे.
महाराष्ट्रातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, स्मार्ट शहर विकास, शहरी प्रशासन, पायाभूत सुविधा आणि नागरी सेवा आदी विषयांवर या राज्यस्तरीय परिषदेत सखोल चर्चा होणार आहे.या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार, आमदार, महापौर, आयुक्त, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती या संस्थेचे प्रादेशिक संचालक दगा पितांबर मत मोरे आणि समन्वयक गोविंद नामदे यांनी दिली.
दरम्यान, या परिषदेत महाराष्ट्र@२०४७ या दीर्घकालीन विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर शहरांच्या सक्षम प्रशासनासाठी आवश्यक धोरणे, आर्थिक स्वावलंबन, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकाभिमुख सेवा यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही १९२६ साली स्थापन झालेली देशातील अग्रगण्य संस्था असून, शहरी प्रशासन क्षेत्रात विविध राज्यांमध्ये कार्यरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी या संस्थेचे मोठे योगदान मानले जाते. महाराष्ट्राच्या भविष्यातील शहरी विकासाचा रोडमॅप ठरवणारी ही परिषद ठरणार आहे.
