शिरूर तालुक्यातील ब्लॅकमेलर राजकीय कार्यकर्त्यापासून सावध रहा!
पुणे ग्रामीण पोलिसांचे आवाहन : याआधी लोणीकंद येथील एका विधवा महिलेची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपल्याचा गुन्हा दाखल
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १७ नोव्हेंबर २०२६ :- माहितीचा अधिकार कायदा हा सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक प्रशासनाचा अधिकार देणारे प्रभावी साधन आहे. मात्र, याच कायद्याचा वापर एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून वैयक्तिक स्वार्थ, दबाव निर्माण करणे आणि नागरिकांना त्रास देण्यासाठी केला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे वाढल्या आहेत. याच व्यक्तीने याआधी लोणीकंद पोलिस ठाण्यात पुण्यातील एका विधवा महिलेची वाघोली येथील जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपल्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी संबंधित कार्यकर्त्यावर गुन्हाही दाखल झाला होता आणि त्यास अटकही करण्यात आले होते. हा राजकीय कार्यकर्ता अनेकांना ब्लॅकमेल करणे, माहिती अधिकाराची धमकी देणे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी लाटण्याची कृती करत असून कल्पेश यादव असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आता हाच कार्यकर्ता माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये, सतर्क राहावे आणि कोणत्याही संशयास्पद प्रकाराची तक्रार पोलिसांकडे करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. संबंधित कार्यकर्त्याच्या विरोधात यापूर्वी सन २०२३ मध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), २०१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे एका विधवा महिलेची जमीन हडपल्याचा त्याच्यावर आरोप होता. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या पूर्वीच्या गुन्हेगारी प्रकरणाची पार्श्वभूमीही चर्चेत आली आहे.
माहिती अधिकाराचा दबावासाठी वापर?
माहितीचा अधिकार हा नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. शासकीय कामकाजात पारदर्शकता आणणे, प्रशासनाला जबाबदार धरणे आणि नागरिकांना आवश्यक माहिती मिळवून देणे, हा या कायद्याचा मूळ उद्देश आहे. मात्र, माहिती अधिकार अर्जांचा वापर करून काही नागरिकांवर दबाव निर्माण करणे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देणे किंवा वैयक्तिक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित कार्यकर्त्याकडूनही अशाच प्रकारे सर्वसामान्य लोकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांनी सावध राहण्याची गरज
माहिती अधिकाराच्या नावाखाली कोणी धमकावत असेल, पैशांची मागणी करत असेल किंवा कोणत्याही प्रकारचा दबाव आणत असेल, तर नागरिकांनी घाबरून न जाता त्याचे पुरावे जतन करावेत. संबंधित व्यक्तीशी झालेला पत्रव्यवहार, संदेश, फोनवरील संभाषणाचे कायदेशीररीत्या उपलब्ध पुरावे आणि पैशांच्या मागणीसंबंधीची माहिती सुरक्षित ठेवावी. अशा प्रकारांची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात करावी.
माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक किंवा आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. कायद्याच्या नावाखाली कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही, याची जाणीव ठेवून संशयास्पद प्रकारांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांकडून सावध राहण्याबाबबतची जनजागृतीपर पोस्ट
दरम्यान, या राजकीय कार्यकर्त्याच्या कृतीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी याच्यापासूध सावध राहण्याबाबबतची जनजागृतीपर
सोशल मीडिया पोस्ट तयार केली असून, मागील दोन दिवसांपासून ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या वेगाने फिरत आहे.
