Pune Zp Literature Conference : 'आम्ही जिल्हा परिषद शाळेत घडलो, तुम्ही बी आमच्यासारखे घडा!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचा जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाचा मंत्र : बालकुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात उलगडला जिल्हा परिषद शाळेच्या आठवणींचा प्रवास
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २८ नोव्हेंबर २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात सावित्री फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समोर जिल्हा परिषद शाळांमधील शेकडो विद्यार्थी बसले होते. त्यांच्या मनात कुतूहल होते, डोळ्यांत भविष्याची स्वप्ने होती. अशा वेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात स्वतःच्या शैक्षणिक प्रवासाची आठवण सांगून केली. मीसुद्धा तुमच्यासारखाच जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी आहे. 'आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकून घडलो, आता तुम्ही बी आमच्यासारखे घडा!, असा आत्मविश्वासाचा मंत्र डॉ. गोसावी यांनी यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. गोसावी यांच्या या शब्दांनी सभागृहातील विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. कारण त्यांच्यासमोर बोलणारी ही व्यक्ती केवळ कोण्या एका विद्यापीठाची कुलगुरू नव्हती, तर त्यांच्यासारख्याच जिल्हा परिषद शाळेत शिकलेली आणि शिक्षणाच्या प्रवासातून मोठ्या पदापर्यंत पोहोचलेली व्यक्ती होती. त्यामुळे कुलगुरूंचा हा संदेश विद्यार्थ्यांसाठी केवळ भाषणातील सल्ला नव्हता, तर स्वतःच्या आयुष्यातून मिळालेला प्रेरणेचा एक अनुभव होता.
निमित्त होते पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित दुसऱ्या बालकुमार मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे (यशदा) अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपल्या शालेय जीवनातील आठवण सांगताना त्यांनी जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊनही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करता येतात, हा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.
कुलगुरूंच्या शब्दांतून विद्यार्थ्यांना दिसला स्वतःचाच चेहरा
सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या आयुष्यात शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसते, तर त्यांच्या स्वप्नांना आकार देणारे पहिले व्यासपीठ असते. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तर अनेकदा शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेतील वातावरण व मिळणाऱ्या संधी यांवरच त्यांच्या पुढील वाटचालीची दिशा ठरत असते. अशा विद्यार्थ्यांसमोर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आपणही जिल्हा परिषद शाळेत शिकलो असल्याचे सांगणे, ही त्यांच्यासाठी विशेष प्रेरणादायी बाब ठरली.
आज मोठ्या पदावर पोहोचलेल्या व्यक्तीने आपल्या शाळेची ओळख अभिमानाने सांगावी आणि विद्यार्थ्यांना त्याच शाळांमधून घडण्याचा सल्ला द्यावा, यातून शिक्षणाचे खरे सामर्थ्य अधोरेखित झाले. परिस्थिती कोणतीही असो, शाळा कोणतीही असो, जिद्द, अभ्यास, जिज्ञासा आणि मेहनतीच्या जोरावर यशाची शिखरे गाठता येतात, हा विश्वास त्यांच्या संदेशातून पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळाला.
साहित्य संमेलनातून बालमनांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ
पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने गेल्या वर्षापासून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी बालकुमार मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. यंदा या संमेलनाचे दुसरे वर्ष आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे, मराठी भाषा व साहित्याची आवड निर्माण करणे, तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या संमेलनाच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे.
या दोन दिवसीय संमेलनात साहित्यिकांशी संवाद, ग्रंथदिंडी, बालकवी संमेलन, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा, बालनाट्य, परिसंवाद आणि शिक्षकांसाठी विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नामवंत लेखक, कवी, साहित्यिक आणि कलावंतांना प्रत्यक्ष भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि स्वतःमधील कलागुण सादर करण्याची संधी मिळत आहे.
एका वाक्यातून विद्यार्थ्यांना मिळाली मोठी उमेद
कधी कधी मोठमोठी भाषणे मनावर ठसा उमटवू शकत नाहीत. पण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील छोटासा अनुभव आयुष्यभर प्रेरणा देऊन जातो. डॉ. गोसावी यांनी सांगितलेली जिल्हा परिषद शाळेची ओळख आणि 'आम्ही जिल्हा परिषद शाळेत घडलो, तुम्ही बी आमच्यासारखे घडा!' हा संदेशही असाच आहे. कदाचित या सभागृहात बसलेल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात भविष्यात शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न असेल, कुणाला लेखक व्हायचे असेल, तर कुणाला मोठ्या विद्यापीठात शिक्षण घ्यायचे असेल. कुलगुरूंच्या या शब्दांनी त्या स्वप्नांना नवी उमेद मिळणार आहे. कारण यशस्वी होण्यासाठी मोठ्या शाळेत शिकणेच आवश्यक नसते. मोठी स्वप्ने पाहणारे आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करणारे मन आवश्यक असते, हाच संदेश या प्रसंगातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे.
बालकुमार साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून उमटलेला हा संदेश दोन दिवसांच्या साहित्यिक सोहळ्यापलीकडे जाणारा आहे. जिल्हा परिषद शाळांमधील प्रत्येक मुलाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवणारा आणि परिस्थितीपेक्षा स्वप्नांना मोठे मानायला प्रेरणा देणारा आहे. कदाचित आज या संमेलनात ऐकलेले हे एक वाक्य उद्या एखाद्या विद्यार्थ्याच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात ठरणार आहे.
पुणे जिल्हा परिषद आणि अमरेन्द्र भास्कर बालकुमार मराठी साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन सरस्वती पूजन, अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ज्ञानदीप प्रज्वलनाने करण्यात आले.
दरम्यान, या संमेलनाचे पहिल्या दिवशी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध भारतीय भाषा, पारंपरिक वेशभूषा आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले. ज्येष्ठ बाल साहित्यिक माधुरी पुरंदरे आणि शिक्षणतज्ज्ञ मंजरी निंबकर यांनी ‘माझी गोष्ट माझे पुस्तक’ या सत्रातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केवळ गुणांच्या टक्केवारीवर न करता त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी लोणी काळभोर येथील आगामी नवनिर्मित शाळेत दोन्ही साहित्य संमेलनांतील बालसाहित्य कायमस्वरूपी जतन केले जाईल, अशी ग्वाही दिली.
परिसंवादात बालसाहित्यिक सुरेश सावंत, आबा महाजन आणि चित्रकार प्रियाल मोटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘एक बालक, एक शिक्षक आणि एक लेखणी यांच्या सामर्थ्याने जगात अमूलाग्र बदल घडू शकतो,’ असा विश्वास सुरेश सावंत यांनी व्यक्त केला. आबा महाजन यांनी कविता आणि स्वतःच्या संघर्षमय यशप्रवासातून विद्यार्थ्यांना पुस्तकांशी मैत्री करण्याचा संदेश दिला. चित्रकार प्रियाल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी चित्ररेखाटन केले.
रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ बालनाट्याचा प्रयोग, ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याशी संवाद आणि ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे व यूट्यूबर सिद्धेश लोकरे यांचे टेड टॉक-पॉडकास्ट हे पहिल्या दिवसाचे प्रमुख आकर्षण ठरले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे-पाटील, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले आदी उपस्थित होते.
