Pune Zp students Literature Festival : पुणे झेडपीच्या शाळांतील चिमुकल्यांच्या स्वप्नांना मिळणार 'साहित्याचे पंख'!

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पुण्यात दुसरे बालकुमार साहित्य संमेलन : बालसाहित्यिकांना साधता येणार नामवंत साहित्यिकांशी साधणार संवाद अन् कविता-कथांतून फुलणार बालप्रतिभा

Pune Zp students Literature Festival : पुणे झेडपीच्या शाळांतील चिमुकल्यांच्या स्वप्नांना मिळणार 'साहित्याचे पंख'!

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २६ नोव्हेंबर २०२६ :- पुणे जिल्ह्याच्या दुर्गम किंवा अतिदुर्गम भागातील एखाद्या छोट्याशा गावात किंवा वाडी, वस्ती किंवा पाड्यांवरील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलाच्या मनात एखादी गोष्ट जन्म घेते, त्यातूनच कुणाच्या वहीत चार ओळींची कविता उमलते, कुणाला चित्रांच्या रंगांतून आपले भावविश्व मांडावेसे वाटते तर, कुणाच्या मनात मोठ्या व्यासपीठावर उभे राहून बोलण्याचे स्वप्न असते. मात्र, या स्वप्नांना व्यक्त करण्यासाठी झेडपी शाळांमधील विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळेलच असे नाही. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कधी संधीची कमतरता, तर कधी परिस्थितीची मर्यादा त्यांच्या कल्पनाशक्तीला वर्गखोलीच्या चार भिंतींतच रोखून धरते. मात्र आता अशाच हजारो बालमनांतील स्वप्नांना आता साहित्याचे पंख लाभणार  आहेत. निमित्त ठरणार आहे, ते म्हणजे पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे!

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना पुस्तकांच्या जगाची सफर घडावी,नामवंत साहित्यिकांशी संवाद साधता यावा आणि स्वतःमधील कलागुण व्यक्त करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने गेल्या वर्षीपासून बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचा हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून, यंदाचे हे दुसरे बालकुमार साहित्य संमेलन हे येत्या शुक्रवारी (दि.२७ नोव्हेंबर)  आणि शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) पुणे शहरातील  यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.

अमरेंद्र भास्कर बालकुमार मराठी साहित्य संस्थेच्या सहकार्याने आयोजित या संमेलनात जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, बालसाहित्यिक, लेखक, चित्रकार आणि कलावंत एकत्र येणार आहेत. हे केवळ साहित्य संमेलन नसून ग्रामीण भागातील मुलांच्या कल्पनाशक्तीला,अभिव्यक्तीला आणि आत्मविश्वासाला नवे क्षितिज देण्याचा प्रयत्न आहे.

ग्रंथदिंडीतून ज्ञानाची पालखी, बालमनांत साहित्याची रुजवण!

हे साहित्य संमेलनाचा प्रारंभ हा येत्या शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. पुस्तकांच्या पालखीसोबत चालणारी बालपावले म्हणजे ही केवळ एका कार्यक्रमाची सुरुवात नसेल, तर मुलांच्या मनात वाचनसंस्कृतीची बीजे पेरण्याचा एक सुंदर प्रयत्न असेल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी,यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे (यशदा) अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

दिग्गज साहित्यिकांशी संवाद, बालमनांना नवे विचार

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ज्या मोठमोठ्या पुस्तकांतून ज्यांची ओळख झाली, अशा साहित्यिकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणार आहे. यानुसार पहिल्या दिवशी ज्येष्ठ बाल साहित्यिक माधुरी पुरंदरे, मंजरी निंबकर, सुरेश सावंत, आबा महाजन आणि चित्रकार प्रिया गोटे यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. विश्वास पाटील यांच्याशी साहित्यिक संवाद साधला जाणार आहे.

याशिवाय 'अलबत्त्या, गलबत्त्या' हे बालनाट्य, चित्रपट कलावंत हेमंत ढोमे यांचा पॉडकास्ट संवाद आणि विविध साहित्यिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना साहित्य, कला आणि मनोरंजनाची अनोखी मेजवानी अनुभवता येणार आहे.

'मिशन भरारी'तून अनुभवांचे आकाश उलगडणार

या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात ज्येष्ठ बाल साहित्यिक राजीव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली 'मिशन भरारी' हा विशेष उपक्रम होणार आहे. यामध्ये 'नासा', इस्त्रो आणि दिल्ली येथील शैक्षणिक उपक्रमांचा अनुभव घेतलेल्या पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आपापले अनुभव मांडता येणार आहेत. मुलांनी पाहिलेल्या नव्या जगाची, अनुभवलेल्या वेगळ्या शिक्षणपद्धतीची आणि मनात साठवलेल्या आठवणींची ही अनुभवयात्रा असणार आहे. 

शनिवारी दुपारच्या सत्रात 'लेखक आपल्या भेटीला' या उपक्रमात बालसाहित्यिक संजय ऐलवाड, प्रा. रामदास केदार आदीसह  बालभारतीचे लेखक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच आयकर विभागाचे अधिकारी अभिनय कुंभार (IRS) आणि ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित देशमुख यांच्याशीही विद्यार्थ्यांना थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

शिक्षकही रंगणार साहित्याच्या मैफलीत

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी बालकवी संमेलन, कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळणार आहे. यामध्ये मराठी, उर्दू आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भाषेची, परिस्थितीची किंवा शारीरिक मर्यादेची कोणतीही भिंत बालप्रतिभेच्या आड येणार नाही, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा पैलू आहे. विशेष म्हणजे, या साहित्य संमेलनात शिक्षकांसाठीही स्वतंत्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कथाकथन, वक्तृत्व, कविता आणि पोवाडा सादरीकरणातून शिक्षकांमधील साहित्यिक आणि कलागुणांनाही व्यासपीठ मिळणार आहे. शनिवारी सायंकाळी ४ वाजता समारोप व पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. यावेळी ज्येष्ठ बाल साहित्यिक डॉ.नरसिंह महादेव जोशी, ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि भारत सासणे आदी उपस्थित राहणार आहेत.

पुस्तकांशी मैत्री, शब्दांशी नाते आणि स्वप्नांना नवी दिशा

खरे तर मुलांच्या हातात पुस्तक दिले की केवळ काही पाने वाचली जात नाहीत, तर त्यांच्या कल्पनांचे नवे विश्व खुले होते. एखादी गोष्ट त्यांना संवेदनशील बनवते, एखादी कविता विचार करायला शिकवते, तर एखाद्या लेखकाचे अनुभव आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. म्हणूनच बालसाहित्य संमेलनाचे महत्त्व केवळ दोन दिवसांच्या कार्यक्रमापुरते मर्यादित नाही. कदाचित याच संमेलनात एखादा विद्यार्थी पहिल्यांदा स्वतःची कविता सादर करेल, एखादी मुलगी पहिल्यांदाच हजारोंच्या उपस्थितीत व्यासपीठावर उभी राहून आत्मविश्वासाने बोलेल, तर एखाद्या छोट्याशा गावातील मुलाला भविष्यात लेखक किंवा साहित्यिक होण्याचे स्वप्न पडेल. आज मिळालेली ही छोटीशी संधी उद्याच्या मोठ्या साहित्यिकाचा जन्म घडवू शकते.

ग्रामीण भागातील मुलांच्या डोळ्यांत स्वप्ने आहेत, मनात कल्पना आहेत आणि शब्दांत व्यक्त होण्याची ऊर्मी आहे. त्यांच्या या भावविश्वाला समजून घेऊन त्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ देणारा पुणे जिल्हा परिषदेचा हा उपक्रम म्हणूनच कौतुकास्पद आहे. दोन दिवसांचा हा साहित्यिक सोहळा संपेल, पण मुलांच्या मनात पुस्तकांविषयी निर्माण झालेली ओढ,शब्दांविषयीची मैत्री आणि नव्या स्वप्नांची उमेद मात्र दीर्घकाळ टिकून राहील, हीच या संमेलनाची खरी फलश्रुती ठरेल.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत साहित्य, कला आणि संस्कृतीचा समन्वय आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नामवंत साहित्यिकांशी संवाद साधण्याची आणि स्वतःच्या कलागुणांना व्यक्त करण्याची संधी या संमेलनातून मिळणार आहे. वाचनाची आवड निर्माण करून सर्जनशील आणि संवेदनशील नागरिक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.

- वीरधवल जगदाळे, 
अध्यक्ष, जिल्हा परिषद,
पुणे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रतिभा आणि कल्पनाशक्ती असून, त्यांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. या संमेलनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती कौशल्य वाढण्यास मदत होईल. 

- विवेक वळसे-पाटील, 
उपाध्यक्ष व शिक्षण समिती सभापती, 
जिल्हा परिषद, पुणे.