NCP Zp Members Group Registration : पुणे झेडपीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्यांना आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्ज करावे लागणार!
प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांची माहिती : येत्या शुक्रवारी अर्ज भरून घेणार: गटनेत्याची निवड व गटनोंदणीही करणार!
डॉ. गजेंद्र बडे: ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ५ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लेखी अर्ज सादर करावे लागणार आहेत. या दोन्ही पदांसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांना येत्या शुक्रवारी (दि.६) पुण्यात हे अर्ज भरावे लागणार आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नमुना अर्ज तयार करण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे पुणे जिल्हा समन्वयक सुरेश घुले यांनी गुरुवारी (दि.५ मार्च) सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांमधून पक्षाचा जिल्हा परिषदेचा गटनेता येत्या शुक्रवारी (दि.५ मार्च) पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत निवडला जाणार आहे. गट नेत्याच्या निवडीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पक्षाच्या गटाची रीतसर नोंदणी करण्यात येणार असल्याचेही सुरेश घुले यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुणे जिल्हा परिषदेची नुकतीच सार्वत्रिक निवडणूक झाली असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता येणार आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष व उपाध्यक्ष येत्या १८ मार्चला निवडले जाणार आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेतच साध्या बहुमताच्या आधारे जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जाणार आहेत.
बंद पाकिटातून येणार गटनेत्याचे नाव
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची आठवडाभरापूर्वी पुण्यात बैठक झाली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे पक्षाच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना या बैठकीला उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता निवडण्याचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे येत्या शुक्रवारी पुणे येथे होत असलेल्या बैठकीत सूनेत्रा पवार यांनी निश्चित केलेले नाव बंद पाकिटातून येणार आहे. या बैठकीत केवळ हे बंद पाकिट फोडून नव्या गटनेत्याचे नाव जाहीर केले जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी विवेक वळसे-पाटील?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी जिल्हा परिषदेच्या सभागृहाची आणि जिल्हा परिषद कामकाज व कायद्याची माहिती असणारा व्यक्ती असावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांनी व्यक्त केली होती. शिवाय मावळत्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षांचे पद हे शिरूर लोकसभा मतदारसंघात होते. त्यामुळे आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद अध्यक्ष नको, अशी मागणी काही जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे बारामती लोकसभा मतदारसंघात येण्यासाठी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे गटनेतेपद हे शिरूर लोकसभा मतदारसंघात मिळण्याची शक्यता आहे. अनुभव आणि निर्माण झालेली परिस्थिती या दोन्ही बाबींचा विचार करता पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असलेले विवेक वळसे-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते असतील, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.