International robotics competition : पुणे जिल्ह्यातील लोणीकंद जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थी करणार दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व : श्रीराज शिंदे आणि आरोही उजगरे यांची निवड! 

आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत झेडपी शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड होणारी पुणे ठरली महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद : सलग दुसऱ्यांदा बहुमान 

International robotics competition : पुणे जिल्ह्यातील लोणीकंद जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थी करणार दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व : श्रीराज शिंदे आणि आरोही उजगरे यांची निवड! 
पुणे :- रोबोटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी केलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व अन्य अधिकारी.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २६ नोव्हेंबर २०२६ :- पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणीकंद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांची दक्षिण कोरियातील सोल येथे होणाऱ्या रोबोटिक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२६ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्रीराज शिंदे व आरोही उजगरे अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोन्ही विद्यार्थी आता सोल येथील  रोबोटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची या स्पर्धेसाठी निवड होणारी पुणे ही महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. पुणे जिल्हा परिषदेला सलग दुसऱ्यांदा हा बहुमान मिळाला आहे. 

भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेला श्रीराज शिंदे हा विद्यार्थी इयत्ता सहावीच्या वर्गात तर, आरोही उजगरे ही इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. ही स्पर्धा येत्या शनिवारी (दि.२८ नोव्हेंबर) आणि रविवारी (दि. २९ नोव्हेंबर) रोजी होत असून  हे दोन्ही विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह गुरुवारी (दि.२६ नोव्हेंबर) पहाटे दक्षिण कोरियाकडे रवाना झाले आहेत.

रोबोटिक्स, कोडिंग आणि उद्योजकता या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळे या जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे-पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले. 

रोबोटिक्स इंडिया नॅशनल चॅंपियनशिप २०२६ या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कारेगाव आणि लोणीकंद जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, या दोन विद्यार्थ्यांसह इंडिया नॅशनल चॅंपियनशिपमध्ये  सहभागी झालेल्या निवडक विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या शिक्षकांनी विवेक वळसे-पाटील आणि गजानन पाटील यांनी जिल्हा परिषदेत संवाद साधला. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले-कावडे, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक व योजना) डॉ. भाऊसाहेब कारेकर आदी उपस्थित होते. 

'स्कोव्हेरा' ॲपची अभिनव संकल्पना

आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेसाठी निवड झालेल्या श्रीराज शिंदे आणि आरोही उजगरे यांनी उद्योजकता आव्हान (Entrepreneurship Challenge) या स्पर्धा प्रकारासाठी 'स्कोव्हेरा' (Schovera) नावाचे बहुभाषिक ॲप विकसित केले आहे. शाळांच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणारे हे ॲप इंटरनेटशिवायही कार्य करू शकते. यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती, विद्यार्थी सुरक्षा, शैक्षणिक माहिती आणि पालक-शिक्षक संवाद यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. या प्रकल्पासह हे विद्यार्थी फोक रेस (Folk Race) आणि गर्ल्स फायर फायटिंग (Girls Fire Fighting) या रोबोटिक्स स्पर्धा प्रकारांतही सहभागी होणार आहेत. दक्षिण कोरियातील सोल येथे होणाऱ्या स्पर्धेत त्यांच्या प्रकल्पाची आणि तांत्रिक कौशल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चाचणी होणार आहे.

कारेगावच्या विद्यार्थ्यांचीही राष्ट्रीय स्तरावर कामगिरी

राष्ट्रीय स्पर्धेत कारेगाव जिल्हा परिषद शाळेतील ५६ विद्यार्थ्यांनी फियाट कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या सहकार्याने सहभाग घेतला. यापैकी सहा विद्यार्थ्यांच्या दोन संघांनी टॉप १० मध्ये, तर अन्य तीन विद्यार्थ्यांच्या एका संघाने टॉप ३ मध्ये स्थान मिळविले आहे. 

'लोणीकंद'च्या १५८ विद्यार्थ्यांचा सहभाग 

दरम्यान ,लोणीकंद जिल्हा परिषद शाळेतील १५८ विद्यार्थ्यांनी झेडएस असोसिएट्सच्या सहकार्याने सहभाग घेतला. यापैकी दहा विद्यार्थ्यांच्या दोन संघांनी टॉप १० मध्ये स्थान मिळविले असून या विद्यार्थ्यांनी उद्योजकता आव्हान आणि फोक रेस या प्रकारांत हे यश संपादन केले आहे.

'सीएसआर'च्या माध्यमातून तंत्रज्ञान शिक्षणाला चालना

जिल्हा परिषद, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीच्या माध्यमातून विविध कंपन्यांच्या सहकार्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग,कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एसटीईएम शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. लोणीकंद शाळेत झेडएस असोसिएट्स, तर कारेगाव शाळेत फियाट कंपनीच्या सहकार्याने तंत्रज्ञानाधारित शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

रोबोटेक्स इंडिया (एज्युकेट टू एलिव्हेट ट्रस्ट) या संस्थेच्या माध्यमातून सरकारी आणि निमशहरी शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते. राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची संधी उपलब्ध होते. दरम्यान, या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अभिनंदन केले आहे. 

ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, सुविधा आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, हेच या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळेच रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता व एसटीईएम शिक्षणाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यावर भर दिला जात असल्याचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण व अनुभवाच्या समान संधी उपलब्ध करून देणे, हे जिल्हा परिषदेचे उद्दिष्ट आहे. तंत्रज्ञानाधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना, सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होते. 

- गजानन पाटील, 
मुख्य कार्यकारी अधिकारी, 
जिल्हा परिषद, पुणे.