Pune graduate & teachers constituency voting : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील ७७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद, येत्या २७ ऑक्टोबरला मतमोजणी! 

पदवीधर मतदारसंघासाठी ६२.७८ टक्के तर, ८५.८७ टक्के मतदान 

Pune graduate & teachers constituency voting : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील ७७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद, येत्या २७ ऑक्टोबरला मतमोजणी! 
पुणे:- पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर लागलेल्या मतदारांच्या रांगा.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २४ ऑक्टोबर २०२६ :- पुणे विभागाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातील ७७ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी (दि.२३ ऑक्टोबर) दुपारी ४ वाजता मतदान यंत्रात बंद झाले. या निवडणुकीच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ६२.७८ टक्के तर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ८५.८७ टक्के मतदान झाले. दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी येत्या मंगळवारी (दि.२७ ऑक्टोबर) रोजी केली जाणार आहे. 

शुक्रवारी मतदान यंत्रात भवितव्य बंद झालेल्यांमध्ये पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील ४७ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील ३० उमेदवारांचा समावेश आहे. या दोन्ही मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी शुक्रवारी ( दि. २३ ऑक्टोबर) सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या निवडणुकीच्या मतदानासाठी दाखल झालेले उमेदवार आणि केंद्रांबाहेर पदाधिकाऱ्यांची गर्दी अशा वातावरणात शुक्रवारी (दि. २३) पुणे विभागाच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान झाले.शिक्षक मतदारसंघासाठी ८५.८७ टक्के, तर पदवीधर मतदारसंघात ६२.७८ टक्के मतदान झाले. पदवीधर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याने ७१.४२ टक्के तर, शिक्षक मतदारसंघात सातारा जिल्ह्याने सर्वाधिक ८९.३९ टक्के मतदान करत आघाडी घेतली आहे. 

पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या दोन्ही मतदारसंघांत शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान झाले. आज सकाळपासूनच मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रांवर दाखल होत होते. विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. 

पुणे पदवीधर मतदारसंघातील एकूण ३ लाख ८८ हजार १९ मतदारांपैकी २ लाख ४३ हजार ६११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १ लाख ६८ हजार ३८२ पुरुष, ७५ हजार २२७ महिला आणि २ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यामध्ये सोलापूरपाठोपाठ सातारा ६६.९२ टक्के, कोल्हापूर ६३.८३ टक्के आणि पुणे जिल्ह्यात ६१.४७ टक्के मतदान झाले आहे. सांगली जिल्ह्यात सर्वांत कमी ५५.६२ टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यात ५४ हजार २२१ पदवीधर मतदारांनी मतदान केले.

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी या मतदारसंघातील एकूण ६१ हजार ९४० मतदारांपैकी ५३ हजार १८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३३ हजार ३०२ पुरुष, १९ हजार ८८० महिला आणि तीन तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात८९ टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात ८८.६२ टक्के आणि सांगलीमध्ये ८७.८३ टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यात ७८.०८ टक्के मतदान झाले आहे. 

जिल्हा व मतदारसंघनिहाय मतदान

( टीप :- अनुक्रमांक, जिल्हा,  पदवीधर मतदान, टक्केवारी, शिक्षक मतदान व  टक्केवारी या क्रमाने) 

१) पुणे --- ५४,२२१ --- ६१.४७ ---  १३,१३५ --- ७८.०८. 

२) सोलापूर --- ३५,५१३ ---  ७१.४२ ---  १३,६१९ --- ८९.००. 

३) सातारा --- ३१,७६४ ---  ६६.९२ ---  ८,४५१ --- ८९.३९. 

४) सांगली --- ४८,९८४ ---  ५५.६२ --- ७,०८१ --- ८७.८३. 

५) कोल्हापूर --- ७३,१२९ --- ६३.८३ --- १०,८९९ --- ८८.६२. 

६) एकूण  --- २,४३,६११ --- ६२.७८ --- ५३,१८५ --- ८५.८७.