Pune District Milk Union Chairman election : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी)अध्यक्षपदी खेडचे अरुण चांभारे यांची बिनविरोध निवड!
जिल्हा दूध संघाच्या ६६ वर्षांच्या इतिहासात खेड तालुक्याला दुसऱ्यांदा संधी : चांभारे यांना उणेपुरा १ वर्षाचा कालावधी मिळणार!
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १२ जून २०२६ :- पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) अध्यक्षपदी खेड (राजगुरुनगर) तालुक्यातील अरुण चांभारे यांची शुक्रवारी (दि.१२ जून २०२६) बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे जिल्हा दूध संघाच्या ६६ वर्षांच्या इतिहासात खेड तालुक्याला दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. चांभारे यांना उणेपुरा १ वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे. यानुसार पुढील वर्षीच्या (२०२७) एप्रिल अखेरपर्यंत चांभारे हे या पदावर कार्यरत राहतील.
याआधी सन १९९७-९८ च्या सुमारास खेड तालुक्यातील दिवंगत बाळासाहेब शेटे यांची जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. शेटे यांच्यानंतर सुमारे २८ वर्षांनी अरुण चांभारे यांच्या निवडीमुळे खेड तालुक्याला जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद मिळाले आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे मावळते अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढमढेरे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी शुक्रवारी (दि. १२ जून २०२६) निवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीसाठी प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या संचालक मंडळाची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.
या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी संचालक अरुण चांभारे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने पीठासन अधिकारी प्रकाश जगताप यांनी अरुण चांभारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण चांभारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, संघाचे सर्व संचालक, दूध संघातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्यावतीने कात्रज मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, महिला अध्यक्षा कांचन ढमाले, खेड पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अरूण चांभारे म्हणाले, "महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला अध्यक्षपद देण्याबाबत शब्द दिला होता. तो शब्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी पाळला. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार सुनिल शेळके, आमदार शंकर मांडेकर, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार सुनिल टिंगरे, माजी आमदार अतुल बेनके, माजी आमदार अशोक पवार तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार व ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली आहे. या सर्वांच्या विश्वासाला मी सार्थ ठरवीन."
सरपंच ते जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष
जिल्हा दूध संघाचे नवे अध्यक्ष अरुण चांभारे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य पदापासून केली आहे. पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य आणि त्यानंतर खेड तालुक्यातील सुपे या गावचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर सन २००७ मध्ये झालेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. पहिली अडीच वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केल्यानंतर दुसऱ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी डिसेंबर २००९ मध्ये त्यांची जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदी निवड झाली. विशेष म्हणजे सभापती निवडीच्या दिवशीच त्यांची पुणे जिल्हा दूध संघाच्या संचालकपदी पहिल्यांदा निवड झाली होती. सध्या त्यांची दूध संघाच्या संचालकपदाची दुसरी टर्म चालू आहे.
--- असाही एक दुर्मिळ योगायोग!
खेड तालुक्यातील दिवंगत बाळासाहेब शेटे यांची सन १९९७-९८ च्या सुमारास दूध संघाच्या संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाल संपत आल्यानंतरच्या शेवटच्या तीन महिन्यांत अध्यक्षपदी निवड झाली होती. या तालुक्यातील दुसरे अध्यक्ष अरूण चांभारे यांनाही आता संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत आल्यानंतरच्या म्हणजेच शेवटच्या नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे दिवंगत शेटे आणि नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण चांभारे यांच्या बाबतीत हाही एक योगायोग आहे.
नवे अध्यक्ष चांभारे यांच्यापुढे दूध संघाची आर्थिक घडी बसविण्याचे आव्हान
दरम्यान, जिल्हा दूध उत्पादक संघाची आर्थिक परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे सध्या पुणे जिल्हा दूध संघाची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. ही आर्थिक घडी बसविण्याचे मोठे आव्हान नवे अध्यक्ष अरुण चांभारे यांच्यापुढे असणार आहे. अशीच परिस्थिती खेड तालुक्यातील पहिले अध्यक्ष दिवंगत बाळासाहेब शेटे यांच्या निवडीच्या वेळी झाली होती. तेव्हाही दूध संघाची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली होती. त्यामुळे दिवंगत बाळासाहेब शेटे यांनी दूध संघातील सुमारे ४५० अतिरिक्त कामगारांना घरचा रस्ता दाखविला होता.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सर्व संचालक मंडळाला बरोबर घेऊन दूध संघाची उन्नती व प्रगती केली जाईल.जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अधिकाधिक आर्थिक हित साधणे, हेच माझे प्रथम प्राधान्य असेल.
- अरूण चांभारे
नवनिर्वाचित अध्यक्ष,
पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी),
पुणे.
