Katraj Dairy milk rate: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (कात्रज डेअरी) दूध खरेदी दरात प्रति लिटर आणखी १ रुपयाची वाढ!
गेल्या सव्वा महिन्यात तिसऱ्यांदा वाढ, पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना 'दिवाळी भेट' : नवी दरवाढ २१ ऑक्टोबरपासून दिली जाणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २२ बर २०२६ :- पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) दूध खरेदी दरात प्रतिलिटर आणखी एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी (दि. २२ऑक्टोबर) घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार ही नवीन दरवाढ दि. २१ ऑक्टोबर २०२६ पासून दिली जाणार असल्याचे जिल्हा दूध संघाचे (कात्रज डेअरी) अध्यक्ष अरुण चांभारे यांनी सांगितले.
दरम्यान, मागील सुमारे सव्वा महिन्यात तिसऱ्यांदा दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेट मिळाली आहे.
याआधी तीनच आठवड्यांपूर्वी म्हणजेच दि.१ ऑक्टोबर २०२६ रोजी आणि त्याआधी दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी अशी दोन वेळा दूध खरेदी दरात प्रतिलिटर प्रत्येकी १ रुपयाची वाढ करण्यात आली होती. या तिसऱ्या नव्या दरवाढीमुळे साडेतीन फॅट आणि ८.५ एसएनएफच्या गायीच्या दुधाचा खरेदी दर आता प्रतिलिटर ४३ रुपये, तर सहा फॅट आणि ९ एसएनएफच्या म्हशीच्या दुधाचा दर आता ५५ रुपये २० पैसे होणार आहे. पशुखाद्य, वैरण आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचेही अरुण चांभारे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
