Working journalist high court decision : दैनिकांचे संपादक आणि निवासी संपादक हेसुद्धा श्रमिक पत्रकारचं, या दोन्ही पदांना श्रमिक पत्रकार कायद्याचे संरक्षण! 

मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा स्पष्ट निर्वाळा : अहिल्यानगर येथील निवासी संपादक सुधीर लंके यांच्याविरोधातील लोकमतची याचिका फेटाळली

Working journalist high court decision : दैनिकांचे संपादक आणि निवासी संपादक हेसुद्धा श्रमिक पत्रकारचं, या दोन्ही पदांना श्रमिक पत्रकार कायद्याचे संरक्षण! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे/अहिल्यानगर, दि. २५ नोव्हेंबर २०२६ :- महाराष्ट्रातील सर्व श्रमिक पत्रकारांना १९५५ च्या श्रमिक पत्रकार कायद्याने संरक्षण आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार दैनिकांमधील संपादक किंवा निवासी संपादक हेसुध्दा श्रमिक पत्रकारचं आहेत. त्यामुळे या दोन्ही पदांसह श्रमिक पत्रकार व्याख्येत येत असलेल्या सर्व कार्यरत पत्रकारांना श्रमिक पत्रकार कायदा लागू असून या कायद्यातील संरक्षणानुसार श्रमिक पत्रकाराची सुडबुद्धीने अन्यत्र बदली केल्यास, त्या बदलीस दिवाणी न्यायालयात आव्हान देता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने दिला आहे. या निकालामुळे संपादक किंवा निवासी संपादक हे श्रमिक पत्रकारचं असल्याच्या व्याख्येवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे हा निकाल राज्यातील सर्व श्रमिक पत्रकारांना दिलासा देणारा ठरणार आहे. 

न्यायमूर्ती संजय ए. देशमुख यांनी दि‌ ५ नोव्हेंबर २०२६ रोजी खुल्या न्यायालयात (ओपन कोर्ट) हा निकाल घोषित केला होता. याबाबतचा लेखी आदेश न्यायालयाने नुकताच पारीत केला आहे. ‘लोकमत’चे अहिल्यानगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांची व्यवस्थापनाने दि.१ जुलै २०२६ रोजी अहिल्यानगर येथून मुंबई येथे बदली केली होती. मात्र ही बदली सूडबुद्धीने आणि अन्यायकारक हेतूने करण्यात आल्याचा आरोप करत लंके यांनी या बदली आदेशाला व बदलीच्या आडून ‘लोकमत’च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरवर्तनाला अहिल्यानगर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात आव्हान दिले होते. या दाव्यात लोकमतच्या व्यवस्थापनासह या कंपनीचे मनुष्यबळ विकास विभागाचे उपाध्यक्ष बालाजी मुळे, अहिल्यानगरचे सरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘लोकमत’ने हा दावा चालविण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला नाही, असा आक्षेप घेत दिवाणी प्रक्रिया संहितेच्या आदेश ७ नियम ११ अन्वये हा दावा फेटाळण्याची मागणी दिवाणी न्यायालयात केली होती. सुनावणीअंती दुसरे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश माधुरी खानवे यांनी लोकमतचा हा आक्षेप फेटाळून दिवाणी न्यायालयाला कार्यक्षेत्र असल्याचा निकाल दिला होता. दिवाणी न्यायालयात लंके यांच्यावतीने ॲड.जॉन खरात यांनी बाजू मांडली. लंके यांची बदली सुडबुद्धीने करण्यात आली व बदलीची प्रक्रिया राबविताना लोकमतच्या अधिकाऱ्यांनी कायदा हातात घेत लंके यांच्या नागरी व कायदेशीर हक्कांचे देखील उल्लंघन केले, असा युक्तिवाद खरात यांनी केला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने लोकमतचा आक्षेप फेटाळला. लोकमतच्यावतीने ॲड. किशोर देशपांडे यांनी युक्तिवाद केला होता. देशपांडे यांनी नोकरी म्हणजे वैयक्तिक सेवा कराराचा भाग असून त्यात हस्तक्षेप करण्याचा दिवाणी न्यायालयाला अधिकार नाही. त्यामुळे हा दावा फेटाळणे आवश्यक असल्याचे म्हटले होते.

दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ‘लोकमत’ने छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात पुनरीक्षण याचिका दाखल केली होती.  बदलीचा निर्णय हा नियोक्त्याच्या प्रशासकीय अधिकार क्षेत्रातील विषय असला तरीही तो विषय सेवा कायद्याने संरक्षित असेल आणि बदलीचा अधिकार नियोक्त्याने अन्य हेतूने किंवा सूडबुद्धीने वापरला असेल तर, अशा बदलीला दिवाणी न्यायालयात आव्हान देता येते, असे उच्च न्यायालयाने या निकालपत्रात स्पष्ट केले आहे. 

'लोकमत'चे निवासी संपादक सुधीर लंके यांची बदली आणि त्यानंतरची कार्यवाही ही काही अधिकाऱ्यांनी सुडापोटी केली असल्याचे मत न्यायालयाने या निकालपत्रात व्यक्त केले आहे. याबाबत लंके यांनी दाव्यासोबत दिलेले पुरावेही न्यायालयाने विचारात घेतले असून लंके यांच्या नागरी हक्कांचे हनन झाले व अधिकाऱ्यांनी अधिकाराचा दुरुपयोग केला, हे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

निवासी संपादक सुधीर लंके हे श्रमिक पत्रकाराच्या व्याख्येत येत नाहीत म्हणून त्यांना बदलीला न्यायालयात आव्हान देण्याचा अधिकार नाही, असा दावा ‘लोकमत’ने या खटल्यात केला होता. उच्च न्यायालयात लंके यांच्या वतीने ॲड. अनिरुद्ध निंबाळकर यांनी बाजू मांडताना ‘लोकमत’चा हा दावा खोडून काढला. लंके हे निवासी संपादक असून श्रमिक पत्रकार आहेत. त्यांना श्रमिक पत्रकार कायद्याचे संरक्षण आहे. इंद्रकुमार जैन प्रकरणातील निकालात उच्च न्यायालयाने महाराष्ट्र मान्यताप्राप्त कामगार संघटना व अनुचित कामगार प्रथा प्रतिबंध अधिनियमातील (MRTU & PULP Act) तरतुदीचा पत्रकार फायदा घेऊ शकत नाहीत, असा निकाल दिला आहे. जेथे अधिकार असतात, तेथे कायदेशीर पर्याय देखील असले पाहिजेत हे तत्त्व आहे. त्यामुळे पत्रकारांना बदली विरोधात इतर फोरम उपलब्ध नसतील, तर चुकीच्या बदलीला आव्हान देण्यासाठी दिवाणी न्यायालय हाच पर्याय आहे, असे निंबाळकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.  न्यायालयाने निंबाळकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरला आणि लंके हे श्रमिक पत्रकार असून त्यांना श्रमिक पत्रकार कायद्यातील तरतुदी लागू होतात, असे महत्त्वपूर्ण निरीक्षणही नोंदविले आहे.

महाराष्ट्रातील श्रमिक पत्रकारांसाठी पथदर्शी निवाडा 

निवासी संपादक सुधीर लंके यांनी आव्हान दिलेली बदलीची कृती दिवाणी न्यायालयात सुनावणीस पात्र असल्याचे उच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिवाणी न्यायालयात आता पुढील सुनावणी सुरु होणार आहे. पत्रकारांना बदलीबाबत कोठे आव्हान देता येईल, हे ठरविण्यासाठी हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. निवासी संपादक हे श्रमिक पत्रकार नाहीत, या ‘लोकमत’च्या दाव्यावर या निकालात न्यायालयाने महत्त्वपूर्ण भाष्य केल्याने पत्रकारांचा श्रमिक पत्रकार म्हणून दर्जा अबाधित राहण्यासही कायदेशीर आधार म्हणून हा निकाल लक्षवेधी मानला जात आहे.