International Women's Day Special : पुणे जिल्ह्यातील पाच महिलांनी हाकला जिल्हा परिषदेच्या कारभाराचा 'गाडा', अध्यक्ष होण्याचा बहुमान!
पुणे झेडपीला तीन महिला 'सिईओ'ही लाभल्या : गेल्या ३० वर्षात २१३ जणींना मिळाला सदस्य होण्याचा मान
जागतिक महिलादिन विशेष
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ८ मार्च २०२६ :- गेल्या तीन दशकांच्या कालखंडात जिल्ह्यातील पाच महिलांना पुणे जिल्हा परिषदेच्या संसाराचा 'गाडा' हाकण्याचा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे. या पाचपैकी दोन महिलांना प्रत्येकी एक वर्ष तर, उर्वरित तीन महिलांना प्रत्येकी अडीच वर्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. मात्र या महिलांना ही संधी कोणी अगदी सहज दिलेली नसून ७३ व्या घटनादुरुस्तीमुळे विविध प्रवर्गातील महिलांसाठी अध्यक्षपद राखीव झाल्यामुळे ही संधी मिळालेली आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय प्रशासकीय सेवेतील तीन महिलांना मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रशासकीय प्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय जिल्ह्यातील २१३ जणींची जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून सन १९९२ पर्यंत म्हणजेच पहिल्या तीन दशकात जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी एकही महिला निवडून आली नव्हती. कारण या कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी आरक्षण नव्हते. हे चित्र सन १९९२ नंतर बदलले. यासाठी नव्याने करण्यखत आलेले महिला धोरण, ७३ वी घटनादुरुस्ती आणि यामुळे महिलांसाठी जिल्हा परिषदेत मिळालेले ३० टक्के आरक्षण हे तीन घटक कारणीभूत ठरले. या तीन घटकांमुळे महिलांचा जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. परिणामी सन १९९२ ते २०२६ या तीन दशकांच्या कालखंडात २१३ महिलांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. सन २०१२ पासून जिल्हा परिषदेतील एकूण सदस्यांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव झाल्यापासून पुढे महिला सदस्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सन १९९७ मध्ये पहिल्यांदा एका महिलेची निवड झाली. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाले होते. त्यावेळी बारामती तालुक्यातील पणदरे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या योगिता कोकरे या पहिल्या महिला जिल्हा परिषद अध्यक्षा झाल्या. परिणामी पुणे जिल्हा परिषदेचा कारभार पहिल्यांदाच एका महिलेच्या हाती आला. त्यांना एक वर्षांचा कार्यकाळ मिळाला. त्यानंतर सन १९९८ मध्ये आंबेगाव तालुक्यातील शैलजा ढोबळे, दौंड तालुक्यातील वैशाली आबणे, मुळशी तालुक्यातील प्रा. सविता दगडे, खेड तालुक्यातील निर्मला पानसरे आदींनी अध्यक्ष या नात्याने जिल्हा परिषदेचा कारभार हाकला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने प्रशासकीय प्रमुख म्हणून काम केलेल्यांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील चारुशीला सोहोनी, अॅना दाणी व व्ही. राधा यांचा समावेश आहे. सोहोनी या दि. २० मे १९८१ ते दि. २९ मार्च १९८२, दाणी या दि. १६ जून १९८३ ते दि. ८ ऑक्टोबर १९८४ आणि व्ही. राधा या दि. १० मार्च १९९९ ते दि. १२ जून २००१ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
महिला अध्यक्षांचा कार्यकाल
- योगिता कोकरे --- दि. २१ मार्च १९९७ ते दि. २० मार्च १९९८.
- शैलजा ढोबळे --- दि. २१ मार्च १९९८ ते दि.२० मार्च १९९९.
- वैशाली आबणे --- दि. २१ मार्च २००७ ते दि. ३० नोव्हेंबर २००९.
- प्रा. सविता दगडे --- दि. १ डिसेंबर २००९ ते दि. २० मार्च २०१२.
- निर्मला पानसरे --- दि. ११ जानेवारी २०२० ते दि.२० मार्च २०२२.
सुहासिनीबाई बांदल ठरल्या पहिल्या महिला झेडपी सदस्या
पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला सदस्य होण्याचा बहुमान सुहासिनीबाई लक्ष्मणराव बांदल यांना मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या दि.६ सप्टेंबर १९६२ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सुहासिनीबाई बांदल यांची जिल्हा परिषदेच्या स्विकृत सदस्यपदी नियुक्ती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. जिल्हा परिषद सदस्य स्व. विठ्ठलराव सातव यांनी हा ठराव मांडला होता. त्यास स्व. शंकरराव ढमाले यांनी अनुमोदन दिले होते.
पंचवार्षिक निवडणूकनिहाय महिला सदस्यांची संख्या
- सन १९९२ ते १९९७ --- २२.
- सन १९९७ ते २००२ --- २४.
- सन २००२ ते २००७ --- २५.
- सन २००७ ते २०१२ --- २४.
- सन २०१२ ते २०१७ --- ३८.
- सन २०१७ ते २०२२ --- ४०.
- सन २०२६ ते २०३१ --- ३९.