Pune Zp Ankita patil : 'हार्वर्ड' विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या पदवीधर बनल्या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती!

पुणे जिल्हा परिषदेला लाभले जागतिक दृष्टिकोनाचे नेतृत्व : अंकिता पाटील-ठाकरे ठरल्या जिल्हा परिषदेच्या इतिहासातील  सर्वाधिक उच्चशिक्षित सभापती 

Pune Zp Ankita patil : 'हार्वर्ड' विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या पदवीधर बनल्या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती!
पुणे:- महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील-ठाकरे.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ६ एप्रिल २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी इंग्लंडमधील हार्वर्ड विद्यापीठ व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यासारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये शिक्षण घेतलेल्या अंकिता पाटील-ठाकरे यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीमुळे पुणे जिल्हा परिषदेला यंदा पहिल्यांदाच जागतिक दृष्टिकोनाचे नेतृत्व लाभले आहे. शिवाय अंकिता पाटील-ठाकरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक उच्चशिक्षित सभापती म्हणून बहुमान पटकावला आहे. यामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात नवा इतिहास घडला आहे. 

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण नवीन समितीच्या सभापती अंकिता पाटील-ठाकरे यांच्या या निवडीमुळे पारंपरिक राजकारणाच्या चौकटीबाहेर जाऊन जागतिक विचारसरणी असलेले नेतृत्व आता ग्रामीण प्रशासनाच्या केंद्रस्थानी आले आहे. परदेशात उज्ज्वल करिअरची संधी असताना, पाटील-ठाकरे यांनी आपल्या मातीत परतत लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला, ही बाबही महत्वपूर्ण मानली जात आहे. शिवाय त्यांच्या या निर्णयामुळे 'गाव ते ग्लोबल' असा विकासाचा नवा मंत्र पुणे जिल्ह्याला मिळणार आहे. 

नवनियुक्त सभापती अंकिता पाटील यांनी पुणे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापन (बी.बी.ए.) या विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील हार्वर्ड विद्यापीठात शाश्वत वित्त आणि गुंतवणूक ( Sustainable finance and investment) या विषयात पदवी प्राप्त केली असून त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थेतून धोरणात्मक व्यवस्थापन (Strategic management) या शाखेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. 

धोरणात्मक व्यवस्थापनाचे मुख्य पैलू 

व्यवसायाचे ध्येय आणि भविष्यातील ध्येय (Vision & Mission) स्पष्ट करणे, बाह्य संधी व धोके (Opportunities or Threats) आणि अंतर्गत ताकद व कमकुवतपणा (Strengths or Weaknesses - SWOT Analysis) तपासणे,  धोरण निर्मिती (Strategy Formulation), उद्दिष्टे गाठण्यासाठी योजना (Plans) बनवणे, योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी (Strategy Implementation) करणे, योजना प्रत्यक्ष कृतीत आणणे, उपलब्ध संसाधनांचे (माणसे, पैसा, वेळ) योग्य नियोजन करणे, मूल्यांकन व नियंत्रण ठेवणे, योजनेच्या यशाचे मोजमाप करणे आणि आवश्यकतेनुसार बदल करणे आदी प्रमुख पैलू आहेत. 

या पैलूंमुळे संस्थेला एक स्पष्ट दिशा मदत होते आणि उद्देश निश्चित करता येते. परिणामी  बाजारात स्पर्धेच्या पुढे राहण्यास मदत होते. शिवाय संस्थेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी फायदा होतो. या सर्व गोष्टींचा फायदा अंकिता पाटील-ठाकरे यांच्या निवडीमुळे पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीला मिळू शकतो, असा जाणकारांचा कयास आहे. 

दरम्यान, अंकिता पाटील-ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम महिला आणि बालकांसाठीच्या आरोग्य सेवा अधिक सुलभ होतील. पर्यायाने महिला सक्षमीकरणाला अधिक गती मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पाहता, त्या जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागात डिजिटल प्रशासन, डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया आणि पारदर्शक कारभार या बाबींवर विशेष भर देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

ग्रामीण भागातील मुलींसाठी नवा आदर्श 

विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील मुलींसाठी हा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. शिवाय उच्च शिक्षण आणि नेतृत्व एकत्र येऊ शकते, याचा हा जिवंत पुरावा म्हणून त्यांच्या निवडीकडे पाहिले जात आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही अंकिता पाटील-ठाकरे यांच्या सभापती निवडीचे स्वागत होत असून, नव्या पिढीचे, अभ्यासू आणि दूरदृष्टीचे नेतृत्व लाभल्याची  प्रतिक्रिया जिल्ह्यातून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अंकिता पाटील-ठाकरे या सध्या एस.बी. पाटील  शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष, अखिल भारतीय साखर कारखाना संघाच्या (All India Sugar Mills Association) सदस्या, 'ईस्मा'च्या (ISMA) विधी उपसमितीच्या सह-आध्यक्ष,  आष्टी शुगर मिल्सच्या अध्यक्ष, इंद्रेश्वर शुगर मिल्स लिमिटेडच्या संचालकपदी कार्यरत आहेत.