Pune Zp Social welfare precident :  गरजूंना योजनांचा लाभ, ठेकेदारांना नो एंट्री, भ्रष्टाचार निर्मूलन, गतीमान प्रशासन अन् नो चिठ्ठी, नो अपॉइंटमेंट! 

पुणे जिल्हा परिषदेचे नवे समाजकल्याण सभापती जितेंद्र बढेकर यांची समाजकल्याण विभागाच्या कामांची 'पंचसूत्री' जाहीर : सर्वसामान्यांना न्याय हेच सामाजिक न्यायाचे सूत्र ठेवणार 

Pune Zp Social welfare precident :  गरजूंना योजनांचा लाभ, ठेकेदारांना नो एंट्री, भ्रष्टाचार निर्मूलन, गतीमान प्रशासन अन् नो चिठ्ठी, नो अपॉइंटमेंट! 
पुणे:- समाजकल्याण सभापती जितेंद्र बढेकर.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ८ एप्रिल २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग म्हणजे खऱ्या अर्थाने तळागाळातील सामान्यतील सामान्य माणसाला सामाजिक न्याय देणारा विभाग असणार आहे. या विभागात विविध कामांसाठी येणाऱ्या व्यक्तीला समान न्याय दिला जाणार आहे. यामुळे यापुढे समाजकल्याण विभागात आणि समाजकल्याण सभापतींच्या दालनात व्हीआयपी संस्कृती (vip culture) पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. यामुळे सभापतींच्या दालनात कोणीही थेट प्रवेश करु शकणार आहे.

यासाठी जिल्हा परिषदेचे नवे समाजकल्याण सभापती जितेंद्र बढेकर यांनी समाजकल्याण विभागाच्या विकासकामांची नवी पंचसूत्री तयार केली आहे. या पंचसूत्रीत जिल्ह्यातील प्रत्येक गरजूंना योजनांचा लाभ, ठेकेदारांना नो एंट्री, भ्रष्टाचाराचे निर्मूलन, गतीमान प्रशासन अन् नो चिठ्ठी,नो अपॉइंटमेंट आदी घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील व्हीआयपी कल्चर आता पूर्णपणे हद्दपार होणार आहे. सर्वसामान्य नागरिक, वंचित घटक, गरजू व्यक्ती आणि तळागाळातील पिडीत व्यक्तींच्या मदतीसाठी काम करणारा विभाग आहे, असा विश्वास निर्माण केला जाणार असल्याचे समाजकल्याण सभापती जितेंद्र बढेकर यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नवीन सभापतींची दि. २ एप्रिल २०२६ रोजी निवड झाली आहे. यामध्ये समाजकल्याण सभापतीपदी हवेली तालुक्यातील उरळीकांचन जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले तरूण, तडफदार आणि युवक नेते जितेंद्र बढेकर यांची समाजकल्याण सभापती म्हणून निवड झाली आहे. दरम्यान, झेडपीत मागील चार वर्षे प्रशासकराज असल्याने विकासकामांचे नव्याने नियोजन करण्याची जबाबदारी नवीन सभापतींंवर आले आहे. यानुसार विकासकामांची घडी व्यवस्थित बसविण्यासाठी आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने जितेंद्र बढेकर यांनी ही विकासाची नवी पंचसूत्री जाहीर केली आहे. 

सभापती भेटीसाठी नो चिठ्ठी, नो अपॉइंटमेंट 

दरम्यान, विविध कामांच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतींना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आता सभापतींच्या परवानगीची गरज लागणार नाही. यानुसार सभापती भेटीसाठी येणारा प्रत्येक नागरिक कसलीही चिठ्ठी न देता किंवा वेळ न घेता (अपॉइंटमेंट) थेट सभापतींच्या दालनात प्रवेश करू शकणार आहे. 

व्हिआयपी संस्कृती बंद 

जिल्ह्याच्या विविध भागातून कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा सभापतींच्या भेटीसाठी तासनतास ताटकळत बसावे लागते.याचे कारण आतापर्यंत रूजलेली व्हिआयपी संस्कृती आहे. सर्वांना समान न्याय या तत्त्वानुसार यापैकी व्हीआयपी आणि सर्वसामान्य माणूस हे एकसमान मानले जातील. यासाठी जसा 'व्हिआयपीं'ना दालनात थेट प्रवेश तसाच थेट प्रवेश सर्वसामान्य नागरिकांनाही दिला जाणार आहे. यामुळे यापुढे समाजकल्याण विभागाच्या सभापतींच्या दालनातील व्हिआयपी संस्कृती बंद होणार आहे. 

ग्रामस्थांचे झेडपीतील कामासाठींचे खेट्टे कमी करणार 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अनेक ग्रामस्थ कामासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात येत असतात. मात्र अनेकदा एका फेरीत त्यांचे काम होत नाही. यातूनच एकाच कामासाठी ग्रामस्थांना अनेकदा झेडपीत खेट्टे मारावे लागतात. यातून ग्रामस्थांचा वेळ आणि पैसा वाया जातो. हे टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात येणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांचे एकाच भेटीत काम केले जाईल आणि ज्यांचे काम करणे अशक्य आहे, अशांना तांत्रिक अडचणींची कल्पना दिली जाईल. यामुळे ग्रामस्थांचा वेळ आणि पैसा वाया जाणार नाही, असे सभापती जितेंद्र बढेकर यांनी सांगितले. 

... अखेर वडिलांचे स्वप्न मुलामुळे पूर्ण 

समाजकल्याण सभापती जितेंद्र बढेकर यांचे वडील बाळासाहेब बढेकर अनेक वर्षे ऊरळीकांचन गावचे सरपंच होते. पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे सभापती होण्याचे त्यांचे स्वप्न होते. प्रत्यक्षात त्यांचे हे स्वप्न साकार होऊ शकले नाही. मात्र आता त्यांचे चिरंजीव जितेंद्र बढेकर हे या विभागाचे सभापती झाले आहेत. यामुळे या निवडीमुळे जितेंद्र बढेकर यांना वडिलांचे स्वप्न साकार करण्यात यश आले आहे. 

बढेकर कुटुंबाला तीन पिढ्यांचा राजकीय वारसा 

समाजकल्याण सभापती जितेंद्र बढेकर यांच्या आज्जी त्रिशला बढेकर या हवेली पंचायत समितीच्या सदस्या होत्या. वडील बाळासाहेब बढेकर उरळीकांचन गावचे सरपंच होते. आई हेमलता बढेकर यांनी हवेली पंचायत समितीच्या सभापती म्हणून काम केले आहे. सभापती जितेंद्र बढेकर यांनी याआधी ऊरळीकांचन गावच्या उपसरपंचपदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समाजकल्याण विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. सध्या सभापती बढेकर यांच्या पत्नी सायली बढेकर या ऊरळीकांचनच्या उपसरपंचपदी कार्यरत आहेत. त्यामुळे सभापती जितेंद्र बढेकर यांच्या कुटुंबीयांना तीन पिढ्यांचा राजकीय वारसा लाभलेला आहे. 

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा माझ्यावर आणि माझ्या कामावर खूप विश्वास होता. यानुसार सभापती झाल्यानंतर दिवंगत अजित पवार यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन, या विश्वासाला तडा न जाऊ देता, हा विश्वास सार्थ ठरविण्याचा संकल्प केला आहे. प्रशासनाला बरोबर घेऊन सर्वसामान्य ग्रामस्थांचे कामे करून हा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. 

- जितेंद्र बढेकर, 
समाजकल्याण सभापती, 
जिल्हा परिषद, पुणे.