Shivsena (UBT) Group leader : पुणे झेडपीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी खेड तालुक्यातील ॲड.विजयसिंह शिंदे! 

झेडपीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाचा पहिला गटनेता होण्याचा मान शिंदे यांनी पटकावला : झेडपीत यंदा पहिल्यांदाच दोन शिवसेना अन् दोन गटनेते 

Shivsena (UBT) Group leader : पुणे झेडपीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी खेड तालुक्यातील ॲड.विजयसिंह शिंदे! 
पुणे:- जिल्हा परिषदेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नवे गटनेते म्हणून अॅड. विजयसिंह शिंदे यांची निवड जाहीर करताना खेडचे आमदार बाबाजी काळे व पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि.१३ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या गटनेतेपदी खेड तालुक्यातील पिंपळगाव तर्फे खेड जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य अॅड. विजयसिंह शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पुणे जिल्हा परिषदेतील पहिला गटनेता होण्याचा बहुमान शिंदे यांना मिळाला आहे. यामुळे पुणे जिल्हा परिषदेत यंदा पहिल्यांदाच दोन शिवसेना आणि दोन गटनेते असणार आहेत. 

शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना गटनेते पदाची ही निवड करण्यात आली. गटनेता निवडीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे शिवसेना पक्षाच्या गटाची नोंदणी करण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे एकूण सहा सदस्य निवडून आले आहेत. यापैकी पाच सदस्य हे एकट्या खेड तालुक्यातील असून अन्य एक सदस्य हा जुन्नर तालुक्यातून निवडून आलेला आहे. 

यावेळी​ या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य गणेश अरगडे, गुलाब पारखे, दीप्ती भोगाडे, तनुजा  घनवट, विनया मुंगसे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषदेच्या सन २०१७ च्या निवडणुकीच्या वेळी एकच शिवसेना होती. त्यामुळे सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत तत्कालीन शिवसेनेच्या गटनेतेपदी अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील आशा बुचके आणि आंबेगाव तालुक्यातील देविदास दरेकर यांनी काम केले. आशा बुचके या सुमारे एक वर्ष तर, उर्वरित चार वर्षे दरेकर या पदावर कार्यरत होते.

दरम्यान, दि. २० मार्च २०२२ रोजी जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल संपला आणि त्यानंतर सुमारे ३ महिन्यांनी म्हणजेच जून २०२२ मध्ये शिवसेना फुटली. या फुटीनंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले आणि शिवसेनेच्या दुसऱ्या गटाच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आले. यानुसार सन २०२६ मध्ये झालेली पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक ही शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही शिवसेना यांनी स्वतंत्रपणे लढविली.

शिवसेनेचे (शिंदे गट) नवनियुक्त गटनेते अॅड. विजयसिंह शिंदे हे  खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. शिंदे यांनी सभापती म्हणून केलेले प्रभावी काम आणि प्रशासकीय कामाचा अनुभव विचारात घेऊन गटनेतेपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तरूण, उच्चशिक्षित व अभ्यासू नेतृत्व, आक्रमक शैली आणि प्रशासनावर असलेली मजबूत पकड ही शिंदे यांची  वैशिष्ट्ये आहेत.