Shivsena Group leader selection: पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी आंबेगाव तालुक्यातील सुवर्णा दरेकर!
शिवसेनेकडून गटनेतेपदी महिलेला पाचव्यांदा संधी : पतीनंतर पत्नीची गटनेतेपदी निवड
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे,दि.१० मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव-पेठ जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा दरेकर यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेकडून जिल्हा परिषद गटनेतेपदी महिलेला पाचव्यांदा संधी देण्यात आली आहे. याशिवाय दरेकर यांच्या निवडीमुळे पतीनंतर पत्नीची जिल्हा परिषदेतील गटनेतेपदी निवड झाल्याचा नवा विक्रम नोंदला गेला आहे.
शिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेमध्ये पाच सदस्य असून त्यांच्या गटाची मंगळवारी (दि. १० मार्च) जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करण्यात आली. तत्पूर्वी शिवसेनेच्या गटनेतेपदी सुवर्णा दरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, देविदास दरेकर रमेश कोंडे यांच्यासह नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे, रूपाली कोंडे, स्मिता कणसे, नेहा पाटील, सुवर्णा दरेकर उपस्थित होते.
पुणे जिल्हा परिषदेत सन २००२ ते सन २०१८ या सलग सोळा वर्षांच्या कालखंडात शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेतेपद महिलेकडे होते. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके या पदावर सलग १६ वर्ष कार्यरत होत्या. या कालावधीत आशा बुचके यांची सलग चार वेळा शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाली होती. यानुसार सन २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या चार जिल्हा परिषद निवडणुकीत आशा बुचके या जुन्नर तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या होत्या.एवढा प्रदीर्घ काळ गटनेतेपदी राहण्याचा विक्रम आशा बुचके यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. चौथ्यांदा गटनेतेपदी निवड झाल्यानंतर उणेपुरे एक वर्षांचाच गटनेतेपदाचा कार्यकाळ आशा बुचके यांना मिळू शकला.
झेडपीत आणखी एका पक्षाच्या गटनेतेपदी महिलेची निवड होणार?
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी आणखी एका महिलेची निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पक्षाच्या गटनेतेपदासाठी महिलेला संधी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील एक माजी आमदार जोरदार प्रयत्न करत आहेत. शिवाय या माजी आमदारांचे संबंधित पक्षात वजन आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी आणखी एका महिलेची निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पतीनंतर पत्नीची गटनेतेपदी निवड एक दुर्मिळ योगायोग
शिवसेनेच्या तत्कालीन गटनेत्या आशा बुचके यांची सन २०१७ मध्ये सलग चौथ्यांदा गटनेतेपदी निवड झाली होती. परंतू, पक्षांतर्गत घडामोडींमुळे उणेपुरे एक वर्षभरच त्या या पदावर कार्यरत होत्या. त्यामुळे उर्वरित चार वर्षांच्या कार्यकाळासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाली. देविदास दरेकर हे सन २०२२ पर्यंत या पदावर कार्यरत होते. नवनियुक्त गटनेत्या सुवर्णा दरेकर या देविदास दरेकर यांच्या पत्नी आहेत. पतीनंतर आता त्यांची गटनेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे पतीनंतर पत्नीची गटनेतेपदी निवड होण्याचा दुर्मिळ योगायोग पहावयास मिळाला आहे.
पुणे जिल्हा परिषदेतील योजना आणि कामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझे प्राधान्य राहील. सभागृहातील आणि प्रशासकीय कामकाजामध्ये गतिमानता यावी, योजना राबवताना कुठेही अनुशेष किंवा विशिष्ट विभागावर अन्याय होणार नाही. यावर देखील आम्ही लक्ष ठेवून न्याय देण्याचा प्रयत्न करू. शिवसेना पक्षाने मला दिलेल्या या संधीचे नक्कीच सोनं करेल.
- सुवर्णा दरेकर,
शिवसेना गटनेत्या,
जिल्हा परिषद, पुणे.