Zilla Parishad School annual gathering : मतेवाडी जिल्हा परिषद शाळेचा 'झेप बाल संस्कारा'ची उपक्रम स्तुत्य : सुवर्णा दरेकर!

शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मोठा वाव 

Zilla Parishad School annual gathering : मतेवाडी जिल्हा परिषद शाळेचा 'झेप बाल संस्कारा'ची उपक्रम स्तुत्य : सुवर्णा दरेकर!
आंबेगाव:- आंबेगाव तालुक्यातील मतेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलनात विविध नृत्यगीते सादर करताना. दुसऱ्या छायाचित्रात प्रमुख पाहुणे सुवर्णा दरेकर अन्य.

ग्रामराज्य वृत्तसेवा

आंबेगाव, दि. ७ मार्च २०२६ :- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मतेवाडी जिल्हा परिषद शाळेने सुरू केलेला 'झेप बाल संस्कारा'ची हा आगळावेगळा उपक्रम स्तुत्य आहे. हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच संस्कार रुजविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे गौरवोद्गार पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या सुवर्णा दरेकर यांनी व्यक्त केले. 

मतेवाडी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य संजय पवळे, माजी पंचायत समिती सदस्य जितेंद्र माळुंजे, कुरवंडी गावचे उपसरपंच जितेंद्र तोत्रे, युवा नेते नितीन तोत्रे, संदिप तोत्रे, केंद्रप्रमुख सीमा कहडणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बबन मते, उपाध्यक्ष गेनभाऊ मते, चेअरमन हरिदास मते, रामदास मते, शिवाजी मते, समाधान सरदार, भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार येवले, खजिनदार सुरेंद्र डोके, संचालक आनंद संत आदी उपस्थित होते.

सुवर्णा दरेकर पुढे म्हणाल्या, " पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा खुप  चांगला असून शिक्षक विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनत घेत आहेत. खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेच्या शाळा या कृतीतुन शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा आदर्शच असतात.तसेच शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी तळमळीने काम करत असतात."
         
'ज्ञानासाठी या, सेवेसाठी जा' हे या शाळेचे ब्रीदवाक्य आहे. शाळेच्या या ब्रीदवाक्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्याचे काम जिल्हा परिषद शाळा करत आहे. वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धामधील यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांना अभ्यासासाठी प्रेरणा देण्याचे काम येथील शिक्षक करत असून शाळेमध्ये राबविले जाणारे विविध उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार आंबेगाव पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य संजय पवळे यांनी यावेळी बोलताना काढले.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. या शाळेचा पट १४ असून या विद्यार्थ्यांनी तब्बल 25 नृत्य  सादर केली. यात " आम्ही जातीचे शेतकरी "या लोकनृत्याने सर्वांची मने जिंकली.स्वर्गात आकाशगंगा या नृत्यालाही ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली.शेवटी शाळा मराठी माझी शाळा मराठी या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी या शाळेतून बदली झालेल्या मनीषा भोईर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या शाळेवर नव्यानेच रुजू झालेले शिक्षक दत्तात्रेय वाळुंज यांचाही सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास मते,भाऊ मते,शिवाजी मते, राजू मते, तुकाराम मते, शरद मते, शशिकांत लोहकरे,कैलास माळुंजे,बंडू मते, वसंत मते, संतोष पारधी, सुरेश शेळके, भरत मते,विलास मते, नामदेव मते, सोमनाथ माळुंजे, शंकर मते आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक  मनोजकुमार सरदार यांनी केले.  दत्तात्रेय वाळुंज यांनी आभार मानले.

झेप बाल संस्कारा'ची उपक्रम काय आहे? 

या शाळेने 'झेप बाल संस्कारा'ची हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. शालेय मुलांमध्ये योग्य संस्कार रुजविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम तीन महिन्यांचा असून बालकांना संस्कारक्षम बनवून एक आदर्श माणूस निर्माण करणे, मुलांमध्ये समाजाप्रती आदरभाव, देशाप्रती प्रेम यासारख्या गुण विकसित करण्याचे काम केले जात आहे. याशिवाय इंग्रजी वाचन व व्हिडिओनिर्मिती, आठवडे बाजार यासारखे उपक्रम राबविले जात आहेत.