Pune zilla parishad savitri jatra : पुणेकरांना अस्सल गावरान खाद्य पदार्थांची चव चाखता येणार!
पुणे जिल्हा परिषदेतर्फे येत्या ७ मार्चपासून 'मिनी सरस : सावित्री जत्रे' चे आयोजन : महिला बचत गटांसाठी हक्काची बाजारपेठ
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २८ फेब्रुवारी २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातर्फे दरवर्षी पुणे शहरात आयोजित केली जाणारी 'मिनी सरस : सावित्री जत्रा यंदाही भरविण्यात येणार आहे. यंदाची ही जत्रा येत्या दि. ७ मार्चपासून आयोजित करण्यात येणार आहे. या जत्रेत पुणेकरांना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या अस्सल गावरान खाद्य पदार्थांची चव चाखता येणार आहे. या जत्रेत जिल्ह्यातील सुमारे १०० हून अधिक महिला बचत गट सहभागी होणार आहेत.
जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे उपस्थित होत्या. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी पुणे शहरात जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.
यंदाची ही सावित्री जत्रा दि. ७ मार्च ते ११ मार्च २०२६ या कालावधीत पुण्यातील शिवाजीनगर (सिंचननगर) येथील कृषी महाविद्यालय मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या या जत्रेत नेहमीच्या वस्तू आणि पदार्थांबरोबरच ग्रामीण संस्कृतीचा साज, महिला सक्षमीकरणाचा आवाज आणि स्वावलंबनाचा तेजस्वी प्रवास यांचा संगम पहावयास मिळणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेले आकर्षक दागिने, हस्तकलेच्या विविध वस्तू, कलात्मक सजावटीच्या वस्तू, सुगंधी मसाले, चविष्ट चटण्या, तयार पिठे, आणि पारंपरिक व आधुनिक पद्धतीचे शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
दरम्यान सावित्री जत्रेदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पुणेकरांना खरेदीसोबतच कला, संस्कृती आणि रुचकर पदार्थांची मेजवानी लाभणार आहे. ग्रामीण महिलांच्या कष्टाला सन्मान, त्यांच्या उद्योगांना व्यापक बाजारपेठ आणि स्थानिक उत्पादनांना नवी ओळख देणारे प्रदर्शन पुणे जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे चंद्रकांत वाघमारे यांनी यावेळी स्पष्ट केले.
झेडपीच्या विविध उपक्रमांची फोटो गॅलरी
पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या वतीने अनेक महत्वकांक्षी प्रकल्प व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, या उद्देशाने सावित्री जत्रेत फोटो गॅलरीचे दालन उभारण्यात येणार आहे.
प्रभारी 'सिईओ' वाघमारे यांचे पुणेकरांना आवाहन
या सावित्री जत्रेत खास करून ग्रामीण भागातील अस्सल गावरान खाद्यपदार्थ, विविध पारंपरिक वस्तू आणि गावगाड्यातील संस्कृती पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण महिला उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पुणेकरांनी महिला उद्योजकांच्या आत्मविश्वासाला बळ द्यावे, असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी केले आहे.